शिवणी रसुलापूर परिसरात दुस-या दिवशीही वाघाची दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 17:46 IST2017-11-16T17:46:27+5:302017-11-16T17:46:59+5:30
शिवणी रसुलापूर : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चिखली वैद्यनजीकच्या गव्हाई शिवारात बुधवारी वाघाचे दर्शन झाले होते.

शिवणी रसुलापूर परिसरात दुस-या दिवशीही वाघाची दहशत
शिवणी रसुलापूर : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चिखली वैद्यनजीकच्या गव्हाई शिवारात बुधवारी वाघाचे दर्शन झाले होते. गुरुवारी सकाळी काही शेतक-यांनी फुबगाव शिवारातील बेंबळा नदीजवळ वाघाची डरकाळी ऐकू आल्याचे सांगितले. यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळावरील प्राण्याच्या पावलांचे ठसे घेतले. ते वरिष्ठांकडे निरीक्षणासाठी पाठविल्याचे समजते.
चिखली येथील अनिल जांगडा या शेतक-याने बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वाघसदृश प्राणी पाहिला. त्यांनी आरडाओरड करताच अनिल आगळे, शंकर बावनकुळे, अंबादास भोयर, ज्ञानेश्वर ढोके हे शेतकरी मदतीला धावले. तोपर्यंत हा प्राणी निघून गेला होता. त्यानंतर नांदगाव खंडेश्वरचे ठाणेदार मगन मेहते, एपीआय सहारे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नागरिकांना दिलासा दिला.
दरम्यान, वनरक्षक सुधीर काळपांडे यांनी पावलांचे ठसे घेतल्याचे सांगितले. वनविभागाची रेस्क्यू टीम गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शिवणी शिवारात दाखल होऊन प्राण्याचा शोध घेईल, असे ते म्हणाले.