गोरेगाव, शेकदरी, पुसला परिसरात व्याघ्र दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:00:02+5:30
तालुक्यातील महेंद्री, पंढरी, लिंगा वनखंडात अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना व्याघ्र दर्शन घडत आहे. अनेकदा वाघाने जनावरांची शिकार केल्याच्या घटना उघड होतात. महेंद्री, पंढरी, शेकदरी या जंगल परिसरात पट्टेदार वाघासह मोठ्या प्रमाणावर हिंस्त्र पशू आहेत. पुसला परिसरातील शेतकऱ्यांना दोन दिवसांपूर्वी वाघाने दर्शन दिल्यानंतर रविवारी पुन्हा गोरेगाव शिवारात वाघाने शिवारफेरी केल्याची घटना पावलांच्या ठशांनी उजेडात आली.

गोरेगाव, शेकदरी, पुसला परिसरात व्याघ्र दर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : गोरेगाव शिवारातील उत्तम आलोडे यांच्या शेतात २६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता वाघाच्या पायांचे ठसे आढळून आले. शेतातून काढता पाय घेत त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वरूड तालुक्यात वाघाचे वास्तव्य स्पष्ट झाल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
तालुक्यातील महेंद्री, पंढरी, लिंगा वनखंडात अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना व्याघ्र दर्शन घडत आहे. अनेकदा वाघाने जनावरांची शिकार केल्याच्या घटना उघड होतात. महेंद्री, पंढरी, शेकदरी या जंगल परिसरात पट्टेदार वाघासह मोठ्या प्रमाणावर हिंस्त्र पशू आहेत. पुसला परिसरातील शेतकऱ्यांना दोन दिवसांपूर्वी वाघाने दर्शन दिल्यानंतर रविवारी पुन्हा गोरेगाव शिवारात वाघाने शिवारफेरी केल्याची घटना पावलांच्या ठशांनी उजेडात आली.
उत्तम आलोडे हे शेतकरी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गोरेगाव शिवारात गेले असता, शेतात वाघाच्या पायाचे ताजे ठसे त्यांच्या निदर्शनास आले. हा परिसर मोर्शी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत येत असल्याने मोर्शीचे वनाधिकारी आनंद सुरत्ने यांनासुद्धा माहिती देण्यात आली.
दरम्यान, परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये वाघाची दहशत पसरली आहे.
गोरेगाव शिवारात जंगली श्वापदाच्या पायाचे ठसे आढळून आले. यापूर्वीही वरूड तालुक्यातील या भागात व्याघ्र दर्शन झाले आहे. शेतकरी तसेच नागरिकांनी सावधतेने शेतावर जावे. हातात काठी, टेंभा घ्यावा तसेच गटाने जावे.
- प्रशांत लांबाडे,
वनाधिकारी, वरूड