भजनांच्या माध्यमातून चरित्र व चारित्र्य निर्माण होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:01 IST2018-10-24T22:00:32+5:302018-10-24T22:01:04+5:30
भजनांच्या माध्यमातून युवा पिढीत चारित्र्य व चरित्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रसंतांनी सुंदर भजनांना राष्ट्रभक्तीची जोड दिली व समाजात चैतन्य निर्माण केले, असे प्रतिपादन बबनराव सराडकर यांनी येथे केले.

भजनांच्या माध्यमातून चरित्र व चारित्र्य निर्माण होते
लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज मोझरी : भजनांच्या माध्यमातून युवा पिढीत चारित्र्य व चरित्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रसंतांनी सुंदर भजनांना राष्ट्रभक्तीची जोड दिली व समाजात चैतन्य निर्माण केले, असे प्रतिपादन बबनराव सराडकर यांनी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित भजन संमेलनाचे उद्घाटन सराडकर यांनी बुधवारी केले. अध्यक्षस्थानी सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे होते. प्रमुख अतिथी म्हणून महिला महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख स्नेहाशिष दास, शरद प्रतिष्ठानचे संयोजक नंदकुमार बंड, माजी उपायुक्त महादेव राघोर्ते, कार्यकारिणी सदस्य भानुदास कराळे, रमेश डेहणकर, नारायण गोमासे, श्रीकांत तोटे, नानासाहेब निवल, दत्ताजी राऊत, बाबूभाई टोले, नीलेश गळे, रघुनाथ कर्डीकर यांची उपस्थिती होती.
मुख्य कार्यक्रमापूर्वी अजय चव्हाण, श्रीजय चव्हाण, चेतन अंबोरे यांच्या चमूने खंजिरी भजनांचे सादरीकरण केले. भजन संमेलनाचे प्रास्ताविक मानवसेवा छात्रालयाचे अधीक्षक अमोल बांबल यांनी केले. संचालन माधुरी भोयर व राहुल काळे यांनी केले.
आज आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
महोत्सवात गुरुवारी दुपारी १२ ते ५ या वेळेत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा होईल. पहाटे सामुदायिक ध्यानाच्या महत्त्वावर विलास साबळे चिंतन व्यक्त करतील. नीळकंठ हळदे ग्रामगीता प्रवचन करतील. डॉ. मुस्ताक शेख हृदयरोग प्रतिबंधावर माहिती देतील. सायंकाळी साहित्यिक सुभाष सावरकर सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर चिंतन प्रस्तुत करतील. यानंतर वरवट खंडेराव येथील श्रीगुरुदेव मित्र भजन मंडळाची भजने व अमरावतीच्या मुक्ता नाल्हे यांचे अभंग गायन होईल. रात्री ९.१५ ते १०.३० दरम्यान नीलेश गावंडे कीर्तन सादर करतील.