हजारो हेक्टरवरील बहरलेल्या संत्र्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:01 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:01:16+5:30

तालुक्यातील शिरजगाव कसबा, घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, करजगाव, सोनोरी, नानोरी भगत मोठ्या प्रमाणात संत्राबागा आहेत. या भागातील शेतकरी संत्रापिकालाच मुख्य व नगदी पीक मानतात. गतवर्षीच्या उन्हाळ्यात अस्मानी संकटामुळे अतिउष्णता व जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे संत्राबागांना पाणी पुरवणे कठीण झाले होते.

Thrifty oranges on thousands of hectares | हजारो हेक्टरवरील बहरलेल्या संत्र्याला गळती

हजारो हेक्टरवरील बहरलेल्या संत्र्याला गळती

ठळक मुद्देसंत्राउत्पादक हवालदिल : अतिपावसाचा फटका

सुमित हरकूट।
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : यंदा तालुक्यात कोसळलेल्या अतिपावसामुळे संत्रा पिकांना चांगलीच गळती लागली आहे. बहरलेल्या संत्राबागेत मोठ्या प्रमाणात संत्राचा सडा पडलेला आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
तालुक्यातील शिरजगाव कसबा, घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, करजगाव, सोनोरी, नानोरी भगत मोठ्या प्रमाणात संत्राबागा आहेत. या भागातील शेतकरी संत्रापिकालाच मुख्य व नगदी पीक मानतात. गतवर्षीच्या उन्हाळ्यात अस्मानी संकटामुळे अतिउष्णता व जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे संत्राबागांना पाणी पुरवणे कठीण झाले होते. वीज उपकरणासह सर्व सुविधा उपलब्ध असताना केवळ पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील हजारो हेक्टरमधील संत्राझाडे वाळून गेली होती. यंदाच्या पावसाळ्यामध्ये अतिपाऊस झाल्यामुळे संत्रा झाडावरील आंबिया बहराची संत्राफळे कुजायला लागली आहेत. संत्रावर पिवळे डाग पडून संत्रा मोठ्या प्रमाणात जमिनीवर गळून पडत असल्याचे चित्र या भागात दिसून येत आहे. यात ब्राम्हणवाडा पाठक, सोनोरी, नोनोरी आदी परिसरात या रोगाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिक पाऊस झाला असून अद्यापही पाऊसाचा जोर कमी झाला नाही. मागील वर्षी ५८७.०३ मिमी. एवढा पाऊस झाला होता. यावर्षी एकूण ९६१.२७ मिमी. पाऊस झाला आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे संत्रा पिकाचा आंबिया बहर चांगलाच बहरला होता. तसेच संत्र्याला चांगली मागणी असून भावदेखील चांगले मिळत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांना यावर्षी चांगले पीक होण्याची खात्री होती. परंतु अति पावसामुळे संत्रा पीक कुजण्यात सुरुवात झाली आहे.

शेतकऱ्यांना चिंता सतावतेय
प्रचंड फळगळतीमुळे पीक हाती येईस्तोवर झाडावर संत्रा टिकणार की नाही, या विवंचनेत संत्राउत्पादक शेतकरी सापडला आहे. तालुक्यातील संत्रातोड करण्यासाठी पितृपक्ष संपताच शुभारंभ होतो. याकरिता दिल्ली, केरळ, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, गोवा येथून मोठमोठे खरेदीदार येतात. अनेक संत्राबागांतील संत्रा खरेदी - विक्री व्यवहार सुरू झाले आहे. मात्र, यावर्षी निसर्गाने संत्रा पिकावर वक्रदृष्टी दाखवल्यामुळे संत्राफळांची गळती वाढली आहे. नेमके यामुळेच संत्र्याचे सौदे घेण्याकरिता व्यापारी मागेपुढे पाहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

Web Title: Thrifty oranges on thousands of hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती