दिशाहीन शासनाची तीन वर्षे
By Admin | Updated: June 9, 2017 00:21 IST2017-06-09T00:21:36+5:302017-06-09T00:21:36+5:30
पारदर्शी कारभार आणि विकासाचा अजेंडा पुढे करणारे केंद्र शासन सर्वच आघाड्यांवर सपशेल अयशस्वी ठरले आहे.

दिशाहीन शासनाची तीन वर्षे
बबलू देशमुख : विकास, पारदर्शी कारभाराचा दावा खोटा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पारदर्शी कारभार आणि विकासाचा अजेंडा पुढे करणारे केंद्र शासन सर्वच आघाड्यांवर सपशेल अयशस्वी ठरले आहे. मोठ्या आणि निवडक उद्योजकांची घरे भरून सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना कंगाल करणाऱ्या या शासनाने तीन वर्षांत देश भकास करून टाकला आहे. निवडणुकीपूर्वी आश्वासनांची खैरात देऊन जनतेची दिशाभूल करण्याचे काम मोदी सरकारने केल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला आहे.
मोदी शासनाने तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने विकासाचा दावा भाजप पदाधिकारी करीत आहेत. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच आहे. भाजप शासनाने या तीन वर्षांत जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य आणि गरीब व शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती फास आवळणारे आहेत. काँग्रेसच्या सत्ता काळात केवळ आम्हीच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो, असा दावा करणाऱ्या भाजपने शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. कर्जमुक्ती न देता कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या डोक्यावर पुन्हा कर्जाचा डोंगर या शासनाने उभा केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी विदेशात दौरे करून काय साध्य केले, याचे उत्तर त्यांनी द्यावे. नोटाबंदी करून मोदी शासनाने सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवली आहे.
काँग्रेस नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या भाजपच्या नेत्यांचाच भ्रष्टाचार आता समोर येतोय. महागाई कमी झालेली नाही. उलट पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच आहेत. सबसिडीच्या नावाखाली घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. कधी नव्हे इतके दहशतवादी हल्ले या तीन वर्षांत झाले आहेत. भाजप सरकार मात्र केवळ सर्जिकल स्ट्राईकचा उदोउदो करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांत केंद्र शासनाने केलेले सर्व दावे खोटे आहेत, असा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला आहे.