मोर्शी तालुक्यात तीन गावे जलमय
By Admin | Updated: July 27, 2014 23:29 IST2014-07-27T23:29:55+5:302014-07-27T23:29:55+5:30
तालुक्यातून वाहणाऱ्या चारघड व देव नदीला पूर आल्याने खेड, उदखेड, खोपडा या तीन गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. सुमारे २०० घरात पुराचे पाणी शिरले असून काही घरांची पडझड झाली. शेकडो एकर शेत

मोर्शी तालुक्यात तीन गावे जलमय
मोर्शी : तालुक्यातून वाहणाऱ्या चारघड व देव नदीला पूर आल्याने खेड, उदखेड, खोपडा या तीन गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. सुमारे २०० घरात पुराचे पाणी शिरले असून काही घरांची पडझड झाली. शेकडो एकर शेत जमिनीवर पुराचे पाणी पसरल्यामुळे, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या पूर पाण्यामुळे प्राणहानी झाली नाही.
खेड गावा शेजारुन चारघढ नदी वाहते. या नदीचा उगम मध्यप्रदेशातून आहे. शनिवारी रात्रीपासून मध्य प्रदेशसह परिसरात जोमाचा पाऊस सुरू असल्यामुळे चारघड नदीला पूर आला. त्यातच चारघड प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने त्याचेही पाणी नदीत आले. त्यामुळे चारघड नदीचा पूर खेड गावातील नदीकाठच्या सखल भागात शिरला. त्यात ३० ते ४० घरे पाण्यात बुडाली. अनेक घरांच्या भिंती कोसळल्या. नदीकाठच्या दोन्ही तीरावरील शेती पुराखाली आल्यामुळे संत्रा बागा, पीक पाण्याखाली आले.
उदखेड गावाला लागून देवनदी आणि चारघड नदीचा संगम होतो. या दोन्ही नद्यांना पूर आल्याने सुमारे ४० ते ५० घरांमध्ये पाणी शिरले. खोपडा गावातील जिल्हा परिषद शाळा आणि ४० ते ४५ घरे पुराच्या पाण्याखाली आली. गावाचा संपर्क तुटला. अंबाडा ते परतवाडामार्गे घाटलाडकी या रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली.
शेतात जवळपास १५ ते २० फूट पाणी साचले आहे. उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार विजय माळवी, निवासी नायब तहसीलदार किशोर गावंडे, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी पूरप्रभावीत गावांना भेटी देवून माहिती प्राप्त करुन घेतली. शिवाय लोकांचे मनोधैर्य वाढविण्याचे प्रयत्न केले.