नवीन तीन विशेष रेल्वे गाड्या १९ जानेवारीपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:12 IST2021-01-18T04:12:26+5:302021-01-18T04:12:26+5:30
अमरावती : कोरोना संसर्ग ओसरत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने काही नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता बडनेरा ...

नवीन तीन विशेष रेल्वे गाड्या १९ जानेवारीपासून सुरू
अमरावती : कोरोना संसर्ग ओसरत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने काही नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता बडनेरा रेल्वे स्थानकाहून ये-जा करण्यासाठी नव्याने तीन रेल्वे गाड्या १९ जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
नागपूर-भुसावळ या दरम्यान लोहमार्गावरून बडनेरा रेल्वे स्थानकावरून मुंबई, पुणे, अहमदाबाद, चेन्नई, हावडा मार्गे ये-जा करण्यासाठी रेल्वे गाड्या धावत आहेत. मात्र, यात नव्याने तीन गाड्यांचा समावेश होणार आहे. यात अहमदाबाद- नागपूर (०११३८) ही गाडी २० जानेवारी रोजी बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहचेल. पुणे- नागपूर (०२११३) ही गाडी १९ जानेवारीपासून सुरू होत असून, मंगळवार, शुक्रवार व रविवार असे आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. मुंबई- नागपूर (०२१६९) ही गाडी २१ जानेवारीपासून सुरू होत असून, दरदिवशी धावणार असल्याची माहिती बडनेरा रेल्वे स्थानकाचे मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांनी दिली. या गाड्या पुढील आदेशापर्यंत सुरूच राहतील, असे स्पष्ट करण्यात आले.
---------------------
अमरावती- मुंबई प्रतीक्षेतच!
कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून बंद करण्यात आलेली अमरावती- मुंबई एक्स्प्रेस सुरू करावी, यासाठी अमरावतीकरांची जोरदार मागणी आहे. तथापि, रेल्वे प्रशासनाने जानेवारीमध्येही मुंबई एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत निर्णय घेतला नाही. दरम्यान खासदार नवनीत राणा यांनीसुद्धा रेल्वे बोर्डाकडे अमरावती- मुंबई एक्स्प्रेस सुरू करण्याविषयी पत्र दिले आहे.