तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मोर्शीची मदार
By Admin | Updated: October 6, 2015 00:22 IST2015-10-06T00:22:42+5:302015-10-06T00:22:42+5:30
केवळ तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर येथील उपजिल्हा रुग्णालय आरोग्यसेवा पुरवीत आहेत.

तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मोर्शीची मदार
उपजिल्हा रूग्णालय वाऱ्यावर : रूग्णांची हेळसांड, अनेक पदे रिक्त, गंभीर रूग्ण उपचारापासून वंचित
लोकमत विशेष
रोहितप्रसाद तिवारी मोर्शी
केवळ तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर येथील उपजिल्हा रुग्णालय आरोग्यसेवा पुरवीत आहेत. विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारीच येथे नसल्यामुळे कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. विशेष असे की, मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बोंडे हे व्यवसायाने स्वत: डॉक्टर असतानादेखील ते उपजिल्हा रुग्णालयाचे चित्र बदलवू शकले नाहीत.
एक दशकापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून ५० स्त्री-पुरुष रुग्णांच्या आंतररुग्ण विभागासह, शल्यक्रिया कक्ष आणि रूग्णसेवेच्या सर्व कक्षांची या इमारतीत सोय करून देण्यात आली. तथापि, मोर्शी उपविभाग आणि नजीकच्या आष्टी तालुक्यातील रुग्णांचा भ्रमनिरास झाला. उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनापासून आजपर्यंत येथे शासकीय मानकाप्रमाणे आवश्यक वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञांची नियुक्ती झालेलीच नाही.
सद्यस्थितीत वैद्यकीय अधीक्षक पदावर प्रभारी वैद्यकीय अधिकारी काम सांभाळत आहेत. बालरोग, स्त्रीरोग, शल्यक्रिया, नेत्ररोग, तज्ज्ञांसह दंतचिकित्सक आणि फिजिशियनची दोन पदे मिळून एकूण आठ पदे शासकीय मानकाप्रमाणे मान्य करण्यात आली आहेत. परंतु सध्या तीन सामान्य वैद्यकीय अधिकारी येथे कार्यरत आहेत. त्यातही कार्यालयीन कामकाजासह संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष देण्याची जबाबदारी यातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याला प्रभारी अधीक्षक म्हणून पार पाडावी लागत आहे. सध्या दररोज जवळपास ४०० ते ४५० रुग्ण रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागाची सेवा घेत आहेत. आंतररुग्ण विभागाच्या महिला आणि पुरुष कक्षातही गर्दी दिसून येते.
या शिवाय आकस्मिक आणि अपघात कक्षात दररोज रुग्ण येतात. या सर्व रुग्णांनी अवघ्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर दर्जेदार वैद्यकीय सेवेची अपेक्षा करणे कितपत योग्य ठरेल, हा प्रश्नच आहे. मोर्शी तालुक्यातील गावखेड्यांतील रुग्णांना याच अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने अनेक गंभीर रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत आहे.
आमदारांना दिलेले आश्वासनही फोल
रुग्णालयातील आंतररूग्ण विभागासोबतच इमारतीतील प्रसाधनगृहेदेखील सदोष आहेत. त्यामुळे प्रसाधनगृहात सर्वत्र घाण पाणी पसरते. याशिवाय प्रसाधनगृहातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या ठिकठिकाणी फुटलेल्या आहेत. परिणामी घाण पाणी इमारतीच्या बाहेर ठिकठिकाणी साचते. त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शव विच्छेदनगृहाच्या मार्गावर या पाण्याचा सर्वत्र चिखल असतो. काही महिन्यांपूर्वी येथील आ. बोंडे यांच्या झालेल्या आढावा बैठकीत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी आमदारांनी बांधकाम विभागाला ही समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. मात्र ते हवेतच विरल्याचे दिसते.
रुग्णालय झाले 'रेफर सेंटर'
येथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे गंभीर रूग्णांना दाखल करून त्यानुषंगाने धोका पत्करण्याच्या मानसिकतेत येथे कार्यरत सामान्य वैद्यकीय अधिकारी दिसत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांना सरळ अमरावती रेफर केले जाते. त्यामुळे गोरगरीब रूग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
अवघ्या तीन सामान्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर आरोग्य सेवेचा डोलारा हाताळताना या अधिकाऱ्यांना उसंत मिळत नाही. त्यातच आंतररुग्ण आणि आकस्मिक, अपघातग्रस्त रूग्ण दाखल झाल्यावर गोंधळ उडते. अशाप्रसंगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या आणि लोकांच्या रोषाला बळी पडावे लागते. अनेक वैद्यकीय अधिकारी याच कारणामुळे येथूनच नोकरी सोडून गेल्याचे बोलले जाते.
इतर पदांचीही तीच स्थिती
तज्ज्ञांचा अभाव असतानाच इतर पदांचीही स्थिती अशीच आहे. अनेकवेळा एक्स-रे तंत्रज्ञाचे पद रिक्त असते. कधी पद भरले तर यंत्रच नादुरुस्त असते. प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञांची पूर्ण पदे भरलेली नाहीत. स्टॉफ नर्सेसची १४ पदे असताना १२ पदे भरण्यात आली आहेत. ईसीजी यंत्र आणि सोनोग्राफी यंत्र आहे. तथापि, या दोन्ही यंत्रासाठी आवश्यक असलेले तज्ज्ञ डॉक्टर्स नाहीत. त्यामुळे या यंत्रांचा लाभ रुग्णांना मिळत नाही. नियमित तीन सफाई कर्मचाऱ्यांची पदे मान्य असताना केवळ एकच पद भरण्यात आले आहे. कंत्राटी सफाई कामगारांना पुरेसा मेहनताना मिळत नसल्यामुळे तेसुध्दा स्वच्छतेकडे हेळसांड होत असल्याचे चित्र आहे.
शवविच्छेदनही अधांतरीच
शवविच्छेदनाकरिता नियमित कर्मचारी नाही. बाहेरील व्यक्तीच्या मदतीने शवविच्छेदन केले जाते. बाहेरील शवविच्छेदकांनी जर शवविच्छेदन न करण्याचे धोरण स्वीकारले तर शवविच्छेदनाकरिता शव वरुड किंवा अमरावतीला न्यावे लागेल, अशी स्थिती आहे. एकूणच बाहेरील शवविच्छेदक शवविच्छेदनाचे कार्य पार पाडत आहेत, हे नातेवाईकांवर उपकारच समजावे, अशी प्रतिक्रिया नागरिकांची आहे.