Three houses were razed in Anjangaon in one night | अंजनगावात एकाच रात्री तीन घरे फोडली
अंजनगावात एकाच रात्री तीन घरे फोडली

ठळक मुद्देबंद घरे लक्ष्य : दोन लाखांचा ऐवज लंपास

अंजनगाव सुर्जी : शहरातील गणेशनगर येथील तीन घरे ९ डिसेंबरच्या रात्रीला फोडण्यात आली. त्या तीन घरांमधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी रंजना बाबाराव ठाकरे (गणेशनगर) यांच्या तक्रारीवरून भादंविचे कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला.
गणेशनगर येथील बहादूर बारब्दे यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत असलेल्या रंजना ठाकरे या ९ डिसेंबर रोजी सकाळी रुग्णालयीन कामानिमित्ताने अमरावतीला आल्या. १० डिसेंबर रोजी अंजनगावला परतत असताना त्यांचे शेजारी प्रवीण ढोले यांनी त्यांच्या भाड्याच्या खोलीचे कुलूप तुटलेला दिसल्याची माहिती फोनद्वारे दिली. त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त आढळून आले. चोरांनी रंजना ठाकरे यांच्या घरातून १ लाख ५५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे आढळून आले. घरमालक बारब्दे यांच्या घरातून सुमारे २० हजार रुपये रोख, चांदीचे भांडे व लगतच्या संजय देवीदास सरोदे यांच्या घरातून १० हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ असा एकूण १.९५ लाखांचा ऐवज चोरीला गेला. एकाच दिवशी तीन घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Three houses were razed in Anjangaon in one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.