डेंग्यूचे आणखी तीन पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 23:20 IST2018-09-21T23:19:44+5:302018-09-21T23:20:08+5:30
जिल्ह्यात आणखी तीन डेंग्यूरुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या आजाराचे गेल्या तीन दिवसांत २३ रुग्ण आढळून आले आहेत.

डेंग्यूचे आणखी तीन पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात आणखी तीन डेंग्यूरुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या आजाराचे गेल्या तीन दिवसांत २३ रुग्ण आढळून आले आहेत.
स्क्रब टायफसचेसुद्धा आणखी तीन रुग्ण शुक्रवारी आढळून आले आहेत. त्या कारणाने आरोग्य प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चव्हट्यावर आला आहे. सदर रुग्ण येथील डॉ. संदीप मलीये यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अमरावती येथील हैदरपुरा परिसरातील २० वर्षीय तरुण तसेच समर्थ कालनी २० वर्षीय तरुण व ३५ वर्षीय महिला रुग्णाचा यामध्ये समावेश असून, चार ते पाच दिवसांपूर्वी सदर रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी दाखल झाले.
अमरावती ग्रामीण व शहरामध्ये डेंग्यूचे आतापर्यंत २१६ रुग्ण आढळून आले आहेत. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिकेने शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबविले. खुद्द पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शहरातील अनेक प्रभागांची पाहणी केली आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावर पोलखोल केली.
दोन पॉझिटिव्ह, एक संशयित
डॉ. संदीप मलीये यांच्याकडे ‘स्क्रब टायफस’ या जीवघेण्या आजाराचे दोन पॉझिटिव्ह, तर एक संशयित रूग्ण आढळून आला. त्यामुळे जिल्ह्यातील स्क्रब टायफस रुग्णांची संख्या आता ६७ झाल्याची माहिती आहे. डॉ. संदीप मलीये यांच्याकडे उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये दर्यापूर तालुक्यातील जुन्या दर्यापूर परिसरातील ७० वर्षीय महिला स्क्रब टायफसचे संशयित म्हणून उपचार घेत आहेत. शेलुबाजार येथील १५ वर्षीय मुलगा व चांदूर रेल्वे तालुक्यातील ५५ वर्षीय महिला स्क्रब टायफसने ग्रस्त आहे. त्यांचे निदान करून औषधोपचार सुरू आहे.