‘ते’ अजूनही शोधतात भाकरीचा चंद्र!
By Admin | Updated: August 3, 2016 00:07 IST2016-08-03T00:07:45+5:302016-08-03T00:07:45+5:30
जन्मापासून मृत्यूपर्यंत गर्भश्रीमंतांपासून सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दु:खात सहभागी होणारा ‘मातंग’ समाज जुळ्या नगरीत नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे उपेक्षित आहे

‘ते’ अजूनही शोधतात भाकरीचा चंद्र!
जुळ्या नगरीत मातंग समाजाची उपेक्षा : बिच्छनच्या पात्रात वास्तव्य
नरेंद्र जावरे ल्ल परतवाडा
जन्मापासून मृत्यूपर्यंत गर्भश्रीमंतांपासून सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दु:खात सहभागी होणारा ‘मातंग’ समाज जुळ्या नगरीत नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे उपेक्षित आहे. शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या बिच्छन नदीच्या पात्रात स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही चंद्रमौळी झोपडीत भाकरीचा चंद्र शोधत आहेत.
अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात मातंग समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनुसूचित जातीमध्ये (एस.सी.) आरक्षणाच्या गप्पा होत असताना त्यांच्यापर्यंत शासकीय योजनाच पोहोचली नसल्याचा आरोप समाजबांधवांनी केला अहे. वीर क्रांतिकारक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ आॅगस्ट रोजी या समाजाकडे अधिकाऱ्यांपासून पुढाऱ्यांचे लक्ष प्रकर्षाने जाते. मात्र दुसरा दिवस उजाडताच सर्वांना विसर पडतो आणि पुन्हा सुरू होते त्यांची असह्य आणि जर्जर जिवनाची सुरुवात. परतवाडा शहरात कालंकामाता परिसर, दयालघाट ते अचलपूर शहरातील गांधी पुलापर्यंत बिच्छन नदीपात्रात गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांनी बस्तान मांडले आहे. बिच्छन नदीला आलेल्या पुराचे पाणी कित्येकदा त्यांच्या घरात घुसून नुकसान झाले. मात्र प्रशासनाने संरक्षण भिंत बांधून त्याची कुठलीच दखल घेतली नाही. बँड वाजवून पोट भरण्यासह मातंग भगिनींना आजही प्रसूतीनंतर बाळंतीणींच्या सेवेसाठी घराघरांत बोलविले जाते. मोबदल्यात त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो.
विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम
अठराविश्व दारिद्र्यात जगणाऱ्या मातंग समाजातील सुशिक्षित बेरोजगारांनी एकत्र येत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शाहीर शीतल साठे यांच्या लोकगीताचा कार्यक्रम रविवार ७ आॅगस्ट रोजी परतवाडा शहरातील कल्याण मंडप्म येथे ठेवला आहे. अचलपूरचे आमदार बच्चू कडू कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. पालकमंत्री प्रवीण पोटे अध्यक्षस्थानी राहतील. कार्यक्रमाला प्रमुख अतिथीपदी खासदार आनंदराव अडसूळ, आ. प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित राहणार आहे. मुक्ता बहुउद्देशीय संस्था व अण्णाभाऊ साठे संघटनेतर्फे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बॅन्ड व्यवसायावर घाला, खोल्या वाटपात दुजाभाव
मातंग समाजाचा परंपरागत व्यवसाय बॅन्ड वाजविण्याचा आहे. मात्र त्यामध्ये शासनाने दुजाभाव केला आहे. अनुसूचित जातीमध्ये मोडणाऱ्या चर्मकार समाजाला मोठ्या प्रमाणात फायबरचे खोके देऊन व्यवसाय थाटण्याची संधी देत सुविधा पुरविली आहे, तर दुसरीकडे मातंग समाजाचे ज्या ठिकाणी बॅन्ड पथकाची दुकाने होती ते पूर्णत: अतिक्रमणामध्ये काढून फेकून देण्यात आली आहे. चर्मकार समाजाप्रमाणे बॅन्ड व्यावसायिकांना का खोके देण्यात आले नाही, अस शासनाचा दुजाभाव त्यांनी पुराव्यासह पुढे आणला आहे आणि त्यावरही कळस म्हणजे बॅन्ड वाजविताना न्यायालयानेसुद्धा आवाजावर मोठ्या प्रमाणात ‘डेसीबल’चे निर्बंध लादले. परिणामी पूर्वीच डीजेमुळे व्यवसायावर संकट कोसळून उपासमार असताना त्यात भर पडली आहे. मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे मत मांडण्यात आले.
घरकूल, रेशनकार्डपासून बेदखल
अचलपूर नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या मातंग समाजापर्यंत आजही रमाई घरकूल योजना पोहोचली नाही, तर दुसरीकडे अनुसूचित जातीमध्ये येणाऱ्या दुसऱ्या जातींना मोठा लाभ देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. घरकूल, रेशनकार्ड शासनाच्या विविध योजना असताना नगरपालिकेने उपेक्षित ठेवल्याचे मधुकर सोनोने, कैलास कल्हाने पवन वैरागडे, कैलास साबळे, शेखर राऊत, मोहन हिवराळे, अविनाश वानखडे, पवन ताकतोडे, लक्ष्मणराव थोरात आदींनी केला आहे.
मुद्रा लोनसुद्धा नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न सर्वांना दाखविले. मात्र ‘मातंग समाज’ला त्यांनी डावलल्याचे सत्य आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी ‘मुद्रा’ लोन देण्याची योजना देशभरातील बँकातून सुरू आहे. त्यामध्ये कुठल्या व्यवसायासाठी किती ‘कर्ज’ द्यावे याचे परिपत्रक असताना ‘बॅन्ड’ व्यवसाय हा फिरता असल्याच्या कारणावरून डावलण्यात आले आहे. परिणामी आता कुणाकडून ठेवावी अच्छे दिनची उमेद, असा प्रश्न समाजबांधवांनी उपस्थित केला.