सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार
By Admin | Updated: October 26, 2014 22:32 IST2014-10-26T22:32:16+5:302014-10-26T22:32:16+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे. गेल्या वर्षीचे सोयाबीन अतिपाऊस, परतीचा पाऊस आणि गारपीट यामुळे गारद झाले. यंदा खंडित पावसामुळे दीड महिना उशिरा झालेली पेरणी व नंतर पावसाची दडी

सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार
२०१३-१४ मधील बियाणे निकृष्ट : यंदा शेंगा पोचट, दाणे झाले बारीक
गजानन मोहोड - अमरावती
जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे. गेल्या वर्षीचे सोयाबीन अतिपाऊस, परतीचा पाऊस आणि गारपीट यामुळे गारद झाले. यंदा खंडित पावसामुळे दीड महिना उशिरा झालेली पेरणी व नंतर पावसाची दडी यामुळे सोयाबीन बाधित झाले. मागीलवर्षीचे सोयाबीन डागी व केवळ ५० टक्के उगवण शक्ती असणारे होते. या बाधित बियाण्यांच्या पेरणीमुळे यंदा सोयाबीनवर पिवळ्या ‘मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव झाला. प्रतिकूल हवामानामुळे ७० टक्के सोयाबीन करपले, शेंगा पोचट राहिल्या. एकरी एक पोत्याची झडती सध्या होत आहे. मागील वर्षीपेक्षाही यंदाचे सोयाबीन खराब असल्यामुळे ते पेरणीयोग्य नाही. परिणामी खरीप २०१५ च्या हंगामात सोयाबीन बियाण्यांची तीव्र टंचाई राहण्याची शक्यता आहे व याला कृषी विभागाने दुजोरा दिला आहे.
सध्या सोयाबीन कापणी व मळणीचा हंगाम सुरू आहे. यापूर्वी सोयाबीनवर झालेल्या पिवळ्या ‘मोझॅक’च्या अटॅकमुळे किमान ७० टक्के क्षेत्रामधील सोयाबीन करपले. शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पाऊस न आल्याने शेंगा पोचट राहिल्या. दाणेही बारीक झाले. यामुळे मळणीमध्ये एकरी एक किंवा दोन पोते सोयाबीन झडत आहे. एकरी १५ हजार रूपये खर्च झाल्यावर जर उत्पन्न अडीच ते तीन हजार मिळत असेल तर त्या सोयाबीन उत्पादकाने जगावे तरी कसे? हा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे.
सद्यस्थितीत २० टक्के संरक्षित सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यां व्यतिरिक्त ८० टक्के सोयाबीन उत्पादक मरणासन्न आहेत. मागील वर्षी सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात ४० टक्क्यांनी घट आली. यंदा त्याहूनही बिकट परिस्थिती आहे. यंदाच्या सोयाबीन उत्पादनात किमान ७० टक्क्यांनी कमी उत्पादन होणार आहे. सलग २ वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांची ही स्थिती आहे. दरवर्षी उत्पादन कमी व बियाणे निकृष्ट यामुळे २०१५ च्या हंगामात सोयाबीन बियाणेच उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
महाबीजचे प्लॉटदेखील निकृष्ट आहेत. अन्य बियाणे कंपन्याची देखील हीच स्थिती आहे. राज्यात सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादकांचीदेखील अशीच व्यथा आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतामधून उपलब्ध होणारे सोयाबीन दरवर्षीप्रमाणे बनावटच राहणार आहे. यामुळे १०० दिवसांचे कॅश क्रॉप (नगदी) यानंतर दुर्लभ होईल. शेतकऱ्यांना यापुढे परंपरागत पिकांवरच मदार ठेवावी लागणार आहे.
सोयाबीन हे नगदी पीक असले तरी शेतकऱ्यांना आता त्यावर अधिक भिस्त ठेवता येणार नाही. त्यामुळे अन्य पर्यायांचा वापर करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असे जाणकारांचे म्हणणे आहे. सोयाबीनचा पुढचा हंगामदेखील फारसा समाधानकारक राहणार नाही, असे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे.