बहुजनांच्या उत्थानासाठी झटणारी माणसे उरली नाहीत
By Admin | Updated: April 11, 2015 00:08 IST2015-04-11T00:08:58+5:302015-04-11T00:08:58+5:30
समाज हा कर्तबगार पुरुषांच्या कर्मावर उभा असतो. ..

बहुजनांच्या उत्थानासाठी झटणारी माणसे उरली नाहीत
भाऊसाहेबांची पुण्यतिथी : बाबा भांड यांचे प्रतिपादन
अमरावती : समाज हा कर्तबगार पुरुषांच्या कर्मावर उभा असतो. दुर्दैवाने आज बहुजनांच्या उत्थानासाठी झटणारी माणसे उरली नाहीत. ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या कल्याणासाठी काम केले अशांचा इतिहास आपण वाचला पाहिजे. बहुजनांच्या आपापसातील भांडणामुळेच त्यांची प्रगती खुंटल्याची खंत ज्येष्ठ लेखक तथा विचारवंत बाबा भांड (औरंगाबाद) यांनी व्यक्त केली.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ५० व्या पुण्यतिथी सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके तर प्रमुख अतिथी म्हणून सुनील देशमुख, महापौर चरणजित कौर नंदा, उषाताई देशमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी विचारपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, वसंतराव चर्जन, डॉ. सुरेश ठाकरे, कोषाध्यक्ष हरिहर ठाकरे, कार्यकारिणी सदस्य एम.के. नाना देशमुख, जगन्नाथ वानखडे, नरेशचंद्र ठाकरे, सचिव प्राचार्य वि.गो. भांबूरकर, स्विकृत सदस्य प्राचार्य डॉ.वि.गो. ठाकरे, प्रा. अरविंद मंगळे, प्राचार्य अरुण सांगोळे, आर.आर. सावरकर व ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राज दत्त यांची उपस्थिती होती.
यावेळी संस्थेच्या ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्यावतीने बांधण्यात अलेल्या कस्तुरबा कन्या शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उषाताई देशमुख यांनी केले.
प्रास्ताविक उपाध्यक्ष वसंतराव चर्जन, संचालन किशोर फुले व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव प्राचार्य वि.गो. भांबुरकर यांनी केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. पंजाबराव उपाख्य बाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर प्रकाश टाकला गेला.