श्रमदानातून तरूण बांधणार ‘त्यांचे’ घर
By Admin | Updated: February 22, 2017 00:16 IST2017-02-22T00:16:01+5:302017-02-22T00:16:01+5:30
तालुक्यातील पिंपळखुटा (मो.) येथील बेघर झालेल्या कडुकार कुटुंबाला गावातील तरूणांनी पुढाकार घेऊन घरकूल बांधून देण्याचा आदर्श संकल्प केला आहे.

श्रमदानातून तरूण बांधणार ‘त्यांचे’ घर
मंदिरही बांधणार : अनेक वर्षांपासून पडक्या घरात कडुकार कुटुंब
मोर्शी : तालुक्यातील पिंपळखुटा (मो.) येथील बेघर झालेल्या कडुकार कुटुंबाला गावातील तरूणांनी पुढाकार घेऊन घरकूल बांधून देण्याचा आदर्श संकल्प केला आहे. विश्वनाथ बापूराव कडुकार (७०) हे वृद्ध कोलमडलेल्या वास्तूत त्यांच्या ४० वर्षीय अपंग मुलाच्या परिवारासह ते राहतात. दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या या वृद्धाला आजपर्यंत हक्काचे घरकूल मिळू शकले नाही.
धर्माच्या नावावर एका हाकेला ओ देऊन समाज एक होतो. हजारो, लाखोंचा निधी जमा होऊन मंदिर बांधले जाते. धार्मिक उत्सव होतो. लाखो रूपये खर्च करून मंदिर बांधायचे, प्रसिद्ध असलेल्या ठिकाणाहून पाषाणाची सुंदर मूर्ती आणायची, प्राणप्रतिष्ठा उत्सव करून प्राणप्रतिष्ठा करायची व नियमित पूजाअर्चना करून मन:शांती करायची. पण दुसरीकडे गावातील एक निराश्रित कुटुंब एका पडक्या जोराच्या वारा-वादळाने अंगावर कधीही कोसळून शकत असणाऱ्या घरात मन:शांती हरवून राहत असेल, तर सद्सद्विवेक बुद्धी जागृत मनाला पाझर फुटणारच. याच भावनेतून पिंपळखुटा (मोठा) येथील तरूणांनी श्रमदानातून व स्वत: निधी उभारून विश्वनाथाचे मंदिर बांधण्याचा दृढ आदर्श संकल्प केला आहे.
या शुभकार्याची सुरूवात म्हणून या युवकांनी गावातील एक सामान्य व्यक्तिमत्त्व बाजीराव पारिसे यांच्या हस्ते पायाभरणीची पूजा करून कुदळी मारली. बांधकाम होईपर्यंत राहण्याची पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली आहे.
मोर्शी पंचायत समितीमधील पिंपळखुटा (मोठा) येथील सुतारकाम करणारे हे वृद्ध विश्वनाथ बापूराव कडुकार यांना नारायण व संजय ही दोन मुले व एक विवाहित मुलगी. आयुष्यभर सुतारकाम करून उदरनिर्वाह करताना तीन मुलांचे विवाहकार्य केले. मोठा मुलगा परिवारासह अमरावती येथे भाड्याच्या खोलीत राहतो. तो पोट भरण्यासाठी गवंडी काम करतो. लहान मुलगा संजय एका हाताने अपंग असून त्याला मिरगीचा आजार असल्यामुळे कामधंदा करू शकत नाही. संजयची पत्नी मोलमजुरी करून वृद्ध सासरा, २ मुलं, पती असा ५ जणांच्या संसाराचा गाडा रेटते.
मागील दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीने कडुकार यांचे कुडा-मातीच्या भिंतीचे कौलारू घर चारही बाजूने पडलेले. घरात जाताना वाकून जावे लागते. सोसाट्याचा वारा वादळ पावसात दोन वर्षे या कुटुंबाने घालवली. संजय यांच्या १० वर्षीय इयत्ता ४ थीत शिकणारा मुलासह व बालवाडीत जाणाऱ्या चिमुकलीसह विश्वनाथ जीव मुठीत घेऊन परिवारासह राहतात. मोठ्या मुलाची जेमतेम कमाई व लहान मुलगा अपंग अशा स्थितीत घरबांधणीची कल्पनाही ते करू शकत नाही. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत कडुकार यांचे नाव असून त्यांना ११ गुण आहेत. आजपर्यंत त्यांना शासकीय योजनेतून घरकूल मिळालेले नाही किंवा आपादग्रस्त म्हणून घरकूल मंजूर होऊ शकले नाही, हे विशेष.
घराची कौलारू वयन जमिनीला टेकल्यामुळे एका खोलीतील वास्तव्य धोक्यात आले असले तरी त्यात कुटुंबाचा वावर आहे. विश्वनाथ कडुकार यांचा सुताराचा व्यवसाय मागील दशकात झालेल्या बदलामुळे संपुष्टात आला. शेतातील अवजारे व घरातील दारे-खिडक्या आता लाकडाऐवजी लोखंडाचा वापर करून बनविली जातात. त्यामुळे त्यांच्या हाताला काम नाही व वृद्धावस्थेत आता शक्यही नाही. घरातील चिमुकल्यांचे वास्तव्य व घरातील अठराविश्वे दारिद्र्य पाहिले की पाहणाऱ्याचे डोळे पाणावतात.
पण परिस्थिती बदलविण्याचा संकल्प पिंपळखुट्यातील तरूणांनी केला असून कडुकर यांचे घर दोन महिन्यात बांधून देण्यात आले आहे. प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली असून याठिकाणी गावातील स्वत: श्रमदान करण्याबरोबरच आवश्यक निधीही खर्च करणार आहे. साडेपाच हजार लोकसंख्या असलेल्या गावातील तरूण स्वत:च्या वर्गणीतून बांधकाम करणार आहे. गावात अनेक धार्मिक कार्यक्रम, उत्सव, मंदिर बांधकामासाठी आजपर्यंत वर्गणी दिली. आता विश्वनाथाच्या जिवंत मुर्तीसाठी मंदिर बांधण्याचा मानस पिंपळखुटा (मो) येथील युवकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)
इंदिरा आवास योजनेच्या घरकूल यादीत विश्वनाथ बापूराव कडुकार यांचे नाव होते. ती योजना आता बंद झाली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रपत्र ‘ड’ मध्ये नाव टाकण्यात आले आहे.
- आशिष गवई,
सचिव, ग्रामपंचायत पिंपळखुटा (मो.)