विदर्भातून २०० एटीएमधारकांचा चोरला डेटा, चंद्रपुरातील तीन आरोपींना ताब्यात घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 21:02 IST2017-12-05T21:01:54+5:302017-12-05T21:02:11+5:30
अमरावती : एटीएम क्लोनिंग प्रकरणातील आरोपींनी विदर्भातील तब्बल २०० खातेदारांचा एटीएम डेटा चोरल्याची माहिती पुढे आली आहे.

विदर्भातून २०० एटीएमधारकांचा चोरला डेटा, चंद्रपुरातील तीन आरोपींना ताब्यात घेणार
वैभव बाबरेकर
अमरावती : एटीएम क्लोनिंग प्रकरणातील आरोपींनी विदर्भातील तब्बल २०० खातेदारांचा एटीएम डेटा चोरल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात अमरावती पोलिसांनी एकास, तर चंद्रपूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. चंद्रपुरातील तीन आरोपींना अमरावती पोलीस प्रॉडक्शन वॉरन्टवर ताब्यात घेणार आहेत.
बँक खात्यातून परस्पर पैसे चोरणाºया आंतरराष्ट्रीय टोळीतील चार आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. यातील हरीश बिस्वास, विशाल उमरे व आलोक नावाच्या आरोपीस चंद्रपूर पोलिसांनी, तर परितोष पोतदारला अमरावती पोलिसांनी दिल्लीवरून अटक केली. या चौघांची पोलीस कोठडीत चौकशी सुुरू आहे. परितोष पोतदार व विशाल उमरे हे दोघेही खातेदारांचा डेटा चोरण्यासाठी अमरावतीत आले होते. या दोघांनी अमरावतीमधील ५० ते ६० जणांचे एटीएम क्रमांक व पासवर्ड दिल्लीत बसलेला बॉस बिस्वासकडे पाठविले होते, तर विदर्भातील विविध शहरातील तब्बल २०० खातेदारांचा डेटा पाठविल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे. देशभरात अशाप्रकारचे अनेक ठिकाण गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे घडल्याचे सांगण्यात येत आहे. या आरोपींकडे विदर्भ व मराठवाड्यातील बँक खातेदारांची माहिती चोरण्याचे काम होते. त्या अनुषंगाने त्यांनी हा डेटा चोरला. चंद्रपूर पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्याचे प्रयत्न अमरावती पोलिसांनी चालविले आहे. मंगळवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रॉक्डक्शन वॉरंटसाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्यानुसार पोलीस चंद्रपुरातील आरोपींना ताब्यात घेऊन या प्रकरणाची पुढील चौकशी करणार आहे.
ओडिशाला पोहोचले अमरावतीचे पथक
एटीएम क्लोनिंग प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली असून, यातील अन्य आरोपी ओडिशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या आरोपींना अटक करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक ओडिशाला रवाना झाले होते. मंगळवारी सायंकाळी पोलीस ओडिशाला पोहोचले. त्यांनी आरोपींचे शोधकार्य सुरू केले होते.