अखेर प्रतीक्षा संपली : अमरावती- मुंबई पहिले टेक ऑफ १६ एप्रिलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:49 IST2025-04-09T11:48:31+5:302025-04-09T11:49:51+5:30
Amravati : मुंबई-अमरावती-मुंबई असा विमानसेवा करार

The wait is finally over: Amravati-Mumbai first takeoff on April 16
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: बहुप्रतीक्षेनंतर अमरावतीविमानतळाहून १६ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता मुंबईकडे पहिले प्रवासी विमान झेपावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणठीस यांच्या हस्ते नवनिर्मित विमानतळाचे लोकार्पण होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यासह आमदार, खासदारांची उपस्थिती असणार आहे. त्या अनुषंगाने अलायन्स एअर लाइन्सकडून मुंबई-अमरावती-मुंबई विमानाच्या शुभारंभाचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.
अमरावती विमानतळाची नुकतीच एटीआर-७२ विमान चाचणी यशस्वी झाली. त्याकरिता इंदूर येथून विशेष विमान आले होते. त्यानंतर अमरावतीचे विमानतळ हे प्रवासी वाहतुकीसाठी सुसज्ज असल्याचे शिक्कामोर्तब झाले. सोमवारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि अलाइन्स एअर लाइनच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. यात अमरावती विमानतळाचे लोकार्पण आणि विमानसेवा सुरु करण्यासाठी विचारमंथन झाले. त्यानुसार, १६ एप्रिल रोजी शुभारंभाला पहिल्या विमानाने प्रवास करण्यासाठी काही जणांनी अलायन्स एअरलाइन्सच्या संकेतस्थळाहून बुकिंगसुद्धा केले आहे. मात्र अमरावती विमानतळाहून आठवड्यातून किती दिवस प्रवासी वाहतुकीच्या वेळापत्रकाबाबत संकेतस्थळावर अधिकृत माहिती टाकण्यात आली नाही. याविषयी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध झाल्या नाहीत.
मुंबई-अमरावती-मुंबई असा विमानसेवा करार
प्रादेशिक संपर्क योजना उडानअंतर्गत व्यावसायिक विमानसेवा अमरावती विमानतळाहून सुरू होत आहे. त्यानुसार आठवड्यातून तीन दिवस अमरावतीकरांना मुंबईने विमानवारी करता येईल, असे वेळापत्रक अलायन्स एअर लाइन्सने जारी केले आहे. अमरावती विमानतळावर अत्याधुनिक पायाभूत सुविधा, नेव्हिगेशन प्रणाली आणि ग्राउंड हैंडलिंगची चाचपणी चमूद्वारे झालेली आहे. अलाइन्स एअर लाइनच्या करारानुसार मुंबई-अमरावती-मुंबई अशी विमानसेवा असणार आहे.