भीती... एकाच कुटुंबातील तिसऱ्या लाडक्या बहिणीचा पत्ता होणार कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:00 IST2025-07-29T15:57:37+5:302025-07-29T16:00:13+5:30
Amravati : अमरावतीमधील पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ तर घेतला नाही?

The third beneficiary of Ladki Bahin from the same family will be cut down
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत एका कुटुंबातील दोन महिलांनाच लाभ मिळणार असतानाही तिसऱ्या-चौथ्या महिलेनेही अर्ज केले. काहींनी रेशनकार्ड वेगळे असल्याचे दर्शविले, वय १८ नसतानादेखील १८ पूर्ण असल्याचे दाखवून अर्ज केले. पण, आता एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थीच्या नावापुढे 'एफएससी मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारून त्यांचा लाडकी बहीण योजनेतून लाभाचा पत्ता कट होणार आहे. विशेष म्हणजे राज्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ १४ हजार २९८ पुरुषांनी घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामध्ये अमरावतीमधील पुरुषांचा तर समावेश नाही ना, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकूण ७ लाख २० हजार ६,६३५ महिलांनी अर्ज केले होते. यापैकी ६ लाख ९५ हजार ३५० लाडक्या बहिणीचे अर्ज मंजूर झाले आहेत, तर २९ हजार ९३७ अर्ज नाकारले आहेत. असे असताना अनेक महिलांनी वार्षिक उत्पन्न कमी दाखवून तसेच रेशनकार्ड वेगळे दर्शवून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविला आहे. आता मात्र पुढील महिन्यापासून कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे. या योजनेसाठी १८ ते ६५ वयोगटांतील महिला पात्र, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे, एकाच कुटुंबातील दोन महिला, लाभार्थीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नको, अशा अटी होत्या.
...या महिलांचा लाभ झाला बंद
वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या स्वतःचे किंवा कुटुंबाकडे चारचाकी वाहन, संजय गांधी निराधार योजनेसह अन्य वैयक्तिक योजनेच्या लाभार्थी, १८ वर्षे पूर्ण नसतानाही अर्ज केलेल्या.
निराधार योजनेचाही घेताहेत लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी असलेल्या अनेक महिला आजही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे यापुढे दोनपैकी एका योजनेचा लाभ महिलांना घेता येणार आहे. त्यामुळे कुठल्याही एका योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे.