लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता ऑगस्ट महिन्यात २,८४,९८२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. आता हाच डेटा वापरून राज्य शासनाच्या 'नमो शेतकरी महासन्मान' योजनेचा दोन हजारांचा सातवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे प्रत्येकी सहा हजार मिळून वर्षाला १२ हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या 'पीएम किसान सन्मान' योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने 'नमो शेतकरी महासन्मान योजना' सुरू केली आहे. या योजनेचे आतापर्यंत सहा हप्ते मिळाले आहे. आता सातवा हप्ता याच आठवड्यात मिळण्याची तरतूद शासनाद्वारे करण्यात आल्याची माहिती आहे.
या लाभार्थीना लाभ
अचलपूर तालुक्यात २३४२२, अमरावती १६७७९, अंजनगाव सुर्जी २००६४, भातकुली १६७४२, चांदूर रेल्वे १४३२७, चांदूरबाजार, २७१८९, चिखलदरा, ११५०२, दर्यापूर २५२७०, धामणगाव रेल्वे १८७८३, धारणी १८२५०, मोर्शी २५८८३, नांदगाव खंडेश्वर २३५०६, तिवसा १५७४५ व वरुड तालुक्यात २७५०० असे एकूण २,८४,९८२ शेतकऱ्यांना 'नमो'चा लाभ मिळेल.
यांचा लाभ थांबविला
दोन्ही योजनांचे लाभार्थी एकच आहेत. योजनेतील शेतकऱ्यांना आधार लिंक करणे व ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया न करणाऱ्या ७३२७ शेतकरी खातेदारांचा लाभ थांबविण्यात आलेला आहे.
"योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी, आधार लिंक तसेच फार्मर आयडी अनिवार्य आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही, त्यांनी प्रक्रिया करावी."- वरुण देशमुख, उपसंचालक, कृषी.