अमरावतीतील आठ एसटी बसस्थानकांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:14 IST2025-03-06T13:10:26+5:302025-03-06T13:14:54+5:30
एसटी महामंडळ : ४१ पैकी १९ सीसीटीव्ही कॅमेरे बंद, सुरक्षारक्षकही नाहीत, बसस्थानकाशेजारून केली जाते खासगी प्रवासी वाहतूक

The security system of eight ST bus stations is at stake
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पुणे येथील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर एसटी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. परिणामी, एसटी महामंडळाच्या बसस्थानकाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशातच जिल्ह्यात ८ आगार आणि ७बसस्थानक, असे एकूण १७ आगार व बसस्थानक आहेत. यापैकी आगार असलेल्या ८ ठिकाणांचा अपवाद सोडला, तर ९ बसस्थानकांपैकी ८ बसस्थानकांत सुरक्षारक्षक नसल्याने ही बसस्थानके वाऱ्यावर आहेत.
अमरावती विभागात अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार, असे ८ आगार आहेत, तर वलगाव, मोझरी, चिखलदरा, धारणी, तिवसा, कुन्हा, धामणगाव रेल्वे, अंजनगाव सुर्जी आणि राजापेठ, अशी ९ बसस्थानके आहेत. आजघडीला विभागात ७१ सुरक्षा रक्षकांची पदे मंजूर आहेत. यापैकी सद्यःस्थितीत ६६ कार्यरत आहेत. यामध्ये अमरावती मध्यवर्ती बसस्थानक येथे एकूण १६ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी १२ सुरक्षारक्षक हे बसस्थानकावर प्रत्येक पाळीमध्ये ३ ते ४ असे एकूण १२ सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत. त्याचप्रमाणे, राजापेठ बसस्थानक येथे सुरक्षारक्षकांची मंजुरात नसल्याने अमरावती बसस्थानकातील १४ पैकी ४ सुरक्षारक्षक राजापेठ बसस्थानक येथे कर्तव्य बजावतात.
४१ पैकी १९ सीसीटीव्ही कॅमेरे बंद
जिल्ह्यातील आगार, बसस्थानकांमध्ये एकूण ४१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वाँच आहे. यामध्ये अमरावती मध्यवर्ती बसस्थानकात ९, वलगाव २, वरूड ६, चांदूर रेल्वे ६, धामणगाव रेल्वे २, तिवसा ४, दर्यापूर ४, अंजनगाव सुर्जी ४, मोर्शी ६, विभागीय कार्यशाळा ६ यांप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
आजघडीला ३० ठिकाणी कामे सुरू आहेत. परंतु, १९ ठिकाणी कॅमेरे बंद आहेत. यामध्ये वलगाव २, धामणगाव रेल्वे २, दर्यापूरचे ४, अंजनगाव सुर्जी ४, तपोवन कार्यशाळेतील ६ यांप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे हे मेन्टनन्सचे कंत्राट संपल्यामुळे, तर काही बांधकामे व नूतनीकरणाच्या कामामुळे बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले.
८७ बसेस
अमरावती विभागासह इतर विभागांच्या ८७ बसेस आगार व बसस्थानकांवर मुक्कामी असतात, अशी माहिती आहे.
आगारात मुक्कामी बसेस
अमरावती - २८
राजापेठ - २०
धामणगाव रेल्वे - ११
परतवाडा - ०९
तिवसा - ०६
वरूड - ०३
अंजनगाव सुर्जी - ०३
चांदूर बाजार - ०१
चिखलदरा - ०१
कुन्हा - ०१
"एसटी महामंडळाच्या धोरणात्मक निर्णयानुसार केवळ मध्यवर्ती बसस्थानकात सुरक्षारक्षक नेमण्याची तरतूद आहे. यानुसार आजघडीला ८ आगार व एका बसस्थानकात सुरक्षारक्षक तैनात आहेत. मात्र, ८ बसस्थानकांत सुरक्षारक्षक नाहीत."
- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक