लाखोंचा महसूल देणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयाजवळ स्वतःचे ऑफिसचं नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:39 IST2024-12-28T12:38:43+5:302024-12-28T12:39:27+5:30

Amravati : चार महिन्यांपासून कार्यालयासाठी भटकंती

The secondary registrar's office, which generates revenue worth lakhs, does not have its own office. | लाखोंचा महसूल देणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयाजवळ स्वतःचे ऑफिसचं नाही

The secondary registrar's office, which generates revenue worth lakhs, does not have its own office.

नरेंद्र जावरे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
चिखलदरा :
शासनाला लाखो रुपयांचा महसूल देणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयावर स्वतःचे कार्यालय शोधण्याची वेळ विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळी आली आहे. मागील चार महिन्यांपासून कार्यालयाची भटकंती सुरू आहे. खरेदी-विक्री करण्यासाठी आवश्यक असलेले हे कार्यालय धारणी येथे आहे. त्यामुळे चिखलदरा तालुक्यातील नागरिकांना उलट प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव आहे.


धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांसाठी दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालय धारणी येथे आहे. दोन्ही तालुक्यांचा कारभार काही वर्षांपासून तेथे सुरू आहे. पूर्वी तो अचलपूर येथून चालायचा. धारणीचा उलटा प्रवास चिखलदरा तालुकावासीयांना करावा लागतो. परिणामी महिन्यातून दुसरा व चौथा मंगळवार आता चिखलदरा येथे हे कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. मागील चार महिन्यांपासून अधिकारी चिखलदरा येतात. परंतु, त्यांना कार्यालय थाटण्यासाठी जागा न मिळाल्याने या सर्वाधिक महसूल देणाऱ्या शासकीय कार्यालयाची भटकंती सुरू आहे. दोन वर्षांपासून चिखलदरा तहसील कार्यालयाचे प्रशस्त इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ते नुकतेच झाले असल्याने त्या इमारतीमध्ये हे कार्यालय थाटले गेल्यास नागरिकांना सोयीचे ठरणार आहे.


या इमारतीमध्ये कार्यालयासाठी जागा मिळावी, यासाठी नुकतीच धारणीचे दुय्यम निबंधक आर.आर. बनसोड यांनी चिखलदऱ्याचे तहसीलदार जीवन मोरणकर यांची भेट घेतली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत एक कक्ष उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे चार महिन्यांपासून भटकंतीवर असलेल्या या कार्यालयाची वाताहत थांबून नागरिकांना न्याय मिळणार आहे.


अचलपूर सोयीचे, धारणीसाठी पायपीट 
चिखलदरा तालुक्याचा संपूर्ण कारभार परतवाडा शहरातूनच चालतो. त्यामुळे काटकुंभ, चुरणी, टेब्रुसोंडा या पट्ट्यातील नागरिकांना अचलपूर येथे दुय्यम निबंध कार्यालय सोयीचे होते. ते धारणीत गेल्याने उलट प्रवास त्यांना करावा लागतो. आता महिन्यातून दुसरा व चौथा मंगळवार चिखलदरा येथे कार्यालय नियमित कामकाज सुरू झाल्यास आर्थिक भुर्दड, प्रवासाची ससेहोलपट थांबणार आहे.


"चिखलदरा येथे दुसरा व चौथा मंगळवार दुय्यम निबंधक कार्यालय राहणार आहे. कार्यालयासाठी जागा तहसीलच्या नवीन प्रशस्ती इमारतीत मिळणार आहे. त्यामुळे जागेचा तिढा जवळपास सुटला आहे. लवकर कार्यालय कार्यान्वित होईल व नागरिकांना सोयीचे होईल." 
- आर.आर. बनसोड, दुय्यम निबंधक श्रेणी-१, धारणी.


 

Web Title: The secondary registrar's office, which generates revenue worth lakhs, does not have its own office.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.