हंगामही संपला, कंपनीही बदलली, १.१९ लाख शेतकरी सोडले वाऱ्यावर
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 3, 2023 16:48 IST2023-07-03T16:31:51+5:302023-07-03T16:48:56+5:30
पीक विमा योजना : योजनेत सहभागी अन्य शेतकऱ्यांना परतावा केव्हा?

हंगामही संपला, कंपनीही बदलली, १.१९ लाख शेतकरी सोडले वाऱ्यावर
अमरावती : पीक विमा योजना म्हणजे कृषी विभागाला अवघड जागेचे दुखणे ठरले आहे. यंदाच्या खरिपासाठी नव्या कंपनीची निवड होऊन योजना लागू झाली. मात्र, गतवर्षीच्या हंगामातील पीक विम्याचा परतावा अद्याप १.१९ लाख शेतकऱ्यांना मिळालेला नाही, यामधील किती जणांना परतावा मंजूर केला ही नावेदेखील कंपनीस्तरावर जाहीर करण्यात आलेली नसल्याचे वास्तव आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामात ८८ महसूल मंडळात झालेली अतिवृष्टी व तीन महिने असणारा सततचा पाऊस यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओल्या दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४२ जाहीर झाली. हाता-तोंडचा घास हिरावल्या गेल्याने पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी २,१९,१०१ शेतकऱ्यांना सरसकट परतावा मिळणे क्रमप्राप्त आहे. त्यातुलनेत कंपनीद्वारा ९९,९४२ शेतकऱ्यांना ९२.२४ कोटींचा परतावा देण्यात आलेला आहे.
आतापर्यंत कंपनीद्वारा देण्यात आलेला परतावा हा ज्या शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिली त्यांना व काढणीपश्चात ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांनाच देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना दिलेली नाही, त्या शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई देणे क्रमप्राप्त असताना अद्याप कंपनीद्वारा या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलेले आहे.