‘RFO’च्या बदल्याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षकांची आज मंत्रालयात पेशी
By गणेश वासनिक | Updated: June 4, 2023 19:25 IST2023-06-04T19:24:30+5:302023-06-04T19:25:47+5:30
भाजपाच्या चार आमदारांची तक्रार, प्रधान सचिवांच्या दालनात होणार सुनावणी, आरएफओंच्या बदल्यांना स्थगिती कायम

‘RFO’च्या बदल्याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षकांची आज मंत्रालयात पेशी
अमरावती : राज्यात सुमारे २०० पेक्षा जास्त वनपरिक्षेत्राधिकारी (आरएफओ)च्या बदल्यांमध्ये गैरप्रकार, अनियमितता झाल्याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एस.पी. राव आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमीता बिश्वास यांची सोमवार, ५ जून राेजी वन मंत्रालयात प्रधान सचिवांच्या दालनात पेशी होणार आहे. आरएफओंच्या बदल्यांना शासनाने स्थगिती दिली, हे विशेष.
भाजपाचे हरिभाऊ बागडे, राम विसपुते, रणधीर सावरकर व आशिष जयस्वाल या चार आमदारांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आरएफओंच्या बदल्यांमध्ये अर्थकारण, गैरप्रकार झाल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे वनमंत्री मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार बदल्यांना स्थगिती देताना आरएफओंच्या बदली प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. परिणामी पीसीसीएफ राव आणि एपीसीएफ बिश्वास यांना आरएफओंच्या बदल्यांची फाईल घेऊन जावे लागणार आहे. प्रादेशिक, सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभागात आरएफओंच्या बदल्या करताना कोणते निकष, नियमावलींचे पालन केले. अनियमितता कुठे झाली? याबाबतची सखोल चौकशी केली जाणार आहे.