लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वरूड तालुक्यातील एका थोराडाने एप्रिल २०२२ मध्ये एका १५ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले होते. त्याला त्या अपहृत मुलीसह मध्य प्रदेशातील एका गावातून ताब्यात घेण्यात आले. ७ मार्च २०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष 'एएचटीयू'ने त्या दोघांना बेनोडा पोलिसांच्या सुपुर्द केले. पोलिसांनी त्या थोराड तरुणास अटक केली. मात्र, आता वयस्क झालेल्या व तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या मुलीला स्वीकारण्यास तिच्या आईने नकार दिला.
४ एप्रिल २०२२ पासून बेनोडा पोलिस ठाण्यात तपासावर असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन पीडित मुलगी व आरोपी मिळून न आल्याने पुढील तपास येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केला. यात एएचटीयूने बारकाईने तपास करून ७ मार्च रोजी आरोपी मनीष (३८, ता. वरूड) व अपहृत मुलीला गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे मध्य प्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील छोटी ग्वालीटोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्या दोघांनी लग्न केल्याचे व ती आता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. दरम्यान, त्या दोघांचे वडील मृत्यू पावले. त्यावेळीदेखील ते दोघेही आपापल्या गावी परतले नाहीत. ती जेव्हा पळून गेली. वडील वारले तरीही आली नाही. त्यामुळे माझ्यासाठी ती तेव्हाच मेली, अशी उद्विग्न भावना व्यक्त करत तिच्या आईने तिला स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मध्य प्रदेशात सचिंगअनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षप्रमुख तथा पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात एएचटीयूच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रशाली काळे, पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर सहारे, सतीश रिठे, आसिफ अहमद, मंगला सनके यांनी ही कारवाई केली. एएचटीयूचे हे पथक आठ दिवस मध्य प्रदेशात पोहोचले. तेथे संपूर्ण फुलप्रूफ सापळा रचत त्या प्रेमीयुगुलास ताब्यात घेण्यात आले.
'एएचटीयू'कडून ३६ गुन्ह्यांचा उलगडाग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय येथे महिला व बालकांच्या अनैतिक मानवी वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष अर्थात अॅन्टी ह्युमन ट्रैफिकिंग युनिट 'एएचटीयू' काम करीत आहे. या कक्षाने सन २०२३ व सन २०२४ मध्ये पोलिस ठाण्याच्या स्तरावर उघडकीस न आलेल्या एकूण ३६ गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा केला.
महिला दिनापर्यंत ४३ मुलामुलींचे अपहरणयंदाच्या १ जानेवारी ते ८ मार्च या कालावधीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून ४३ अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण करण्यात आले. त्यात सर्वाधिक टक्का मुलींचाच आहे. गतवर्षीच्या पहिल्या सव्वादोन महिन्यात अल्पवयीनांना फूस लावून पळवून नेल्याच्या प्रकरणांची संख्या २८ होती, तर सन २०२४ मध्ये अल्पवयीन मुलामुलींच्या अपहरणाचे एकूण २११ एफआयआर नोंदविले गेले होते.
४२ मुली पळवून नेल्याची नोंद यंदा पोलिसांमध्ये आहे.१ जानेवारी ते ८ मार्च या कालावधीत ४२ अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले. तर एका मुलाचे अपहरण करण्यात आल्याचीही नोंद आहे.
"तीन वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या त्या मुलीने आता वयाचे १८ वर्षे पूर्ण केलेत. तिने आरोपीसोबत लग्न केले. ती गर्भवतीदेखील आहे. आरोपीला बेनोडा पोलिसांच्या ताब्यात दिले. तिच्या आईने तिला नाकारले."- प्रशाली काळे, सहायक पोलिस निरीक्षक, एएचटीयू