प्रशासनाच्या दाव्याचा फुगा फुटला! लक्ष्मी गॅस एजन्सीला कुलूप; संतप्त ग्राहकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
By प्रदीप भाकरे | Updated: March 25, 2026 15:44 IST2026-03-25T15:43:28+5:302026-03-25T15:44:19+5:30
Amravati : शहरात गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला खरा, मात्र अवघ्या २४ तासांत या दाव्याची अक्षरशः पोलखोल झाली आहे.

The administration's claim has burst! Laxmi Gas Agency locked; Angry customers stage a protest at the District Collector's office
अमरावती: शहरात गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला खरा, मात्र अवघ्या २४ तासांत या दाव्याची अक्षरशः पोलखोल झाली आहे. रुक्मिणी नगर येथील लक्ष्मी गॅस एजन्सीच्या संचालकाने मंगळवारपासून कार्यालयाला कुलूप लावून पोबारा केल्याने संतप्त ग्राहकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेतली. या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजनावर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मॅनेजर पसार, ग्राहकांचा संयम सुटला
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी गॅस एजन्सीच्या ग्राहकांना गॅस वितरणाचे मेसेज आले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी १० वाजेपासून शेकडो ग्राहक एजन्सीवर पोहोचले. मात्र, मंगळवार दुपारपासूनच एजन्सीचे शटर बंद करून मॅनेजर फरार झाल्याचे दिसून आले. हक्काचा गॅस मिळत नसल्याने आणि अधिकारी दाद देत नसल्याने ग्राहकांचा पारा चढला. संतप्त नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून प्रशासनाकडे जाब विचारला.
पोलीस बंदोबस्तात उघडले शटर
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अन्नधान्य वितरण अधिकारी प्रवीण राऊत आपल्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ग्राहकांनी अधिकाऱ्यांसमोरच जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. अखेर वाढता तणाव पाहता, पोलीस बंदोबस्तात एजन्सीच्या बंद शटरचे कुलूप उघडण्यात आले.
दाव्यांची झाली 'पोलखोल'
विशेष म्हणजे, शहरात गॅस पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कालच दिले होते. मात्र, एका एजन्सीने हजारो ग्राहकांना वेठीस धरल्याने प्रशासनाचा हा दावा फोल ठरला आहे. गॅस एजन्सीच्या या मुजोरीमुळे सामान्यांचे हाल होत असून, संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.