कोरोना लसीचे परीक्षण आमच्या शरीरावर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:01:28+5:30
अमरावतीच्या चपराशीपुरा येथील राजेंद्रसिंह बघेल, आनंदसिंह ठाकूर व तपोवन परिसरातील प्रफुल्ल भुसारी या तिघांनी कोविड -१९ लसीचे परीक्षण पशू-प्राण्यांऐवजी आमच्या शरीरावर करून देशातील १३५ कोटी जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. या तिघांनी दिलेल्या निवेदनातून कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती मांडली आहे. कोविड-१९ मुळे वैश्विक, जैविक आपत्ती आलेली आहे.

कोरोना लसीचे परीक्षण आमच्या शरीरावर करा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना कोविड-१९ लसीचे परीक्षण हे पशू- प्राण्यांवर न करता मनुष्यावर करावे. त्याकरिता आम्ही तिघे जण तयार आहोत. आमच्या शरीरावर लसीचे परीक्षण करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रभक्त असलेल्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी निवेदन सादर केले आहे.
अमरावतीच्या चपराशीपुरा येथील राजेंद्रसिंह बघेल, आनंदसिंह ठाकूर व तपोवन परिसरातील प्रफुल्ल भुसारी या तिघांनी कोविड -१९ लसीचे परीक्षण पशू-प्राण्यांऐवजी आमच्या शरीरावर करून देशातील १३५ कोटी जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. या तिघांनी दिलेल्या निवेदनातून कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती मांडली आहे. कोविड-१९ मुळे वैश्विक, जैविक आपत्ती आलेली आहे. देशात ही महामारी झपाट्याने पसरत असताना अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. अद्यापही कोरोनावर मात करण्यासाठी लस तयार करण्यात आलेली नाही. काही शास्त्रज्ञांनी ही लस तयार करण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. मात्र, या लसीचे परीक्षण ते पशुंवर करणार आहेत. पशू, प्राण्यांवर अशा लसीचे परीक्षण होत असेल तर, १३५ कोटी लोकसंख्येच्या भारतासाठी ही नामुष्की आहे.
मानवी जीवनासाठी नेहमीच मूक पशू, प्राण्यांवर प्रयोग केला जातो, हे योग्य नाही. त्यामुळे लाखो लोकांचे बळी घेणाºया कोरोना लसीचे परीक्षण करण्यासाठी आम्ही शरीर देण्यास तयार आहोत. केंद्र सरकारने परवानगी देऊन देश कर्तव्य सेवेची संधी आम्हाला द्यावी, अशी मागणी या तिघांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके यांच्याकडे मागणीचे निवेदन पाठविले आहे.
लॉकडाऊनच्या काळात कोरोना विषाणूबाबत सायकलने जनजागृती केली. दरम्यान, गरजू, अपंग, वृद्ध, परप्रांतीय श्रमिकांना अन्नदान केले. पशू, प्राण्यांवर कोविड १९ च्या लसीचे परीक्षण होणे हे संयुक्तिक नाही. त्यामुळे आम्ही शरीर परीक्षणासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
- राजेंद्रसिंह बघेल, चपराशीपुरा.