नंदनवनाचा पारा घसरला; चिखलदरा @ ४.८ अंश सेल्सियस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 12:02 IST2022-01-25T11:59:22+5:302022-01-25T12:02:51+5:30
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळासह परिसरात हिवाळ्यात गारवा असतो. परंतु, मागील १५ दिवसांपासून पारा कमालीचा घसरला आहे.

नंदनवनाचा पारा घसरला; चिखलदरा @ ४.८ अंश सेल्सियस
अमरावती : अचानक आलेल्या थंडीच्या लाटेने गत पंधरा दिवसांपासून सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. आठवड्यात ओसरत आलेली लाट पुन्हा सोमवारपासून कडाक्याच्या थंडीने सुरू झाली आहे. सकाळी चिखलदरा परिसराचे तापमान ४.८ अंश सेलिअस नोंदविले गेले. पर्यटकांना कोरोना नियमावलीमुळे पालिकेने बंदी घालण्यात आली आहे.
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळासह परिसरात हिवाळ्यात गारवा असतो. परंतु, मागील १५ दिवसांपासून पारा कमालीचा घसरला आहे. सकाळी ७ वाजता ४.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या २० दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पाच अंशाखाली तापमानाची नोंद झाली. कुडकुडत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक घराबाहेर निघताना गरम कपडे, तर दिवसाही आदिवासी पाड्यांमध्ये शेकोट्या पेटविल्या आहेत. पर्यटन स्थळासह मेळघाट पूर्णत: गारठला आहे. आदिवासी नागरिक थंडीपासून बचावासाठी अंगावर गरम कपडे, ब्लॅंकेट घालत चुलीजवळ व धुणी, शेकोट्यांजवळ आश्रय घेत आहेत. १५ दिवसांपासून अचानक वाढलेली थंडी अंगात हुडहुडी भरणारी ठरली आहे.
पर्यटकांना बंदी
चिखलदरा पर्यटनस्थळावर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केल्यानंतर पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन नगरीत शुकशुकाट आहे. नगरपालिकेच्या पर्यटक कर नाक्याहून स्थानिक वगळता इतरांना प्रवेश नाकारला जात आहे.