मंदिरे उघडली, यात्रा-जत्रा लॉकडाऊनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:30 IST2020-12-15T04:30:32+5:302020-12-15T04:30:32+5:30
अमरावती : अनलॉकमध्ये सर्व उद्योग, व्यवसायांबरोबरच धार्मिक स्थळेही उघडण्यात आली. मात्र, धार्मिक कार्यातील उपस्थितीवर मर्यादा कायम असल्याने ...

मंदिरे उघडली, यात्रा-जत्रा लॉकडाऊनच
अमरावती : अनलॉकमध्ये सर्व उद्योग, व्यवसायांबरोबरच धार्मिक स्थळेही उघडण्यात आली. मात्र, धार्मिक कार्यातील उपस्थितीवर मर्यादा कायम असल्याने यात्रा-जत्रा लॉक़डाऊन आहेत. त्याचा परिणाम स्थानिक अर्थकारणावर होत असून, छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना फटका बसत आहे.
जिल्ह्यात अनेक देवस्थाने असून, त्यांच्यामार्फत यात्रा व रथोत्सवाचे आयोजन होत असते. या यात्रांमध्ये राज्याच्या कोनाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यात्रा-जत्रा बंदच आहेत. राज्यात प्रसिद्ध बहिरम यात्रा, संत गाडगेबाबा जन्मोत्सव यात्रेसह ऋणमोचन, धानोरा, सालबर्डी, पिंपळोद येथील यात्रांचे स्वरूप मोठे आहे. या यात्रांमध्ये देवदर्शनासाठी जिल्ह्यासह राज्यातील भाविक येत असतात. मात्र, या यात्रांवर यंदा कोरोनाचे सावट प्रभावी ठरले. त्यातच जिल्हा प्रशासनाने भाविकांच्या उपस्थितीवर निर्बंध लावले आहेत. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये कमाल मर्यादा ५० जणांची आहे. त्यामुळे यात्रा लॉकडाऊन आहेत.
बॉक़्स
स्वयंस्फूर्तीने निर्णय
कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी कोरोनाचा संसर्ग अजूनही संपलेला नाही. लस निर्मिती सुरू असली तरी ती सर्वसामान्यांना टोचली जाईपर्यंत धास्ती कायम आहे. नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाबाबत मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे. त्यामुळे गावोगावच्या देवस्थान कमिटी स्वयंस्फूर्तीने बैठकी घेऊन यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेत आहे. परिणामी प्रशासनाचा ताण काही प्रमाणात का होईना, कमी होण्यास मदत होत आहे.