टेलिमेडिसीन सेंटर आदिवासींसाठी संजीवनी
By Admin | Updated: December 14, 2015 00:16 IST2015-12-14T00:16:43+5:302015-12-14T00:16:43+5:30
आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील टेलिमेडिसीनच्या कामकाजाची पाहणी केली.

टेलिमेडिसीन सेंटर आदिवासींसाठी संजीवनी
आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी : व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वैद्यकीय सल्ला
अमरावती : आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील टेलिमेडिसीनच्या कामकाजाची पाहणी केली.
मेळघाटातील वीज व संवादाची अडचण लक्षात घेता शासनाने मेळघाटातील माता, बालमृत्यूचे प्रमाण कमी करून सर्वांना आरोग्य सुविधा उपलब्धीसाठी टेलिमेडिसीन सेंटर सुरू केले आहे. या केंद्रात अद्ययावत उपकरणे बसविण्यात आली असून याव्दारे दुर्धर आजारावर मुंबई, नागपूर, पुणे तसेच अन्य ठिकाणाच्या सर्जनशी संवाद साधून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे वैद्यकीय सल्ला घेण्यात येतो. मुंबई येथील संदीप राणे, अवस्थी, स्वनिश सावंत या सर्जनशी संवाद साधून सहा रुग्णांच्या दुर्धर आजारावरील सल्ला घेण्यात आला. यातील २-३ रुग्णांना तातडीने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचार करण्याचे निर्देश दीपक सावंत यांनी दिले.
यावेळी आ. प्रभुदास भिलावेकर, नागपूरचे सर्जन दंदे, आरोग्य संचालक सतिश पवार, अतिरिक्त संचालक अर्चना पाटील, सीईओ सुनील पाटील, आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे, जिल्हा शल्य चिकित्सक अरूण राऊत, निकम, सतीश हुमणे, नेत्रतज्ञ कांचन जवंजाळ, वैद्यकीय अधिकारी पी.एन. गोरडे, बालरोगतज्ज्ञ जावरकर, टेलिमेडिसीनच्या प्रकल्प व्यवस्थापक राजर्षी गुरव, विनोद मेहेत्रे, शिवराय महादेवकर, गजानन नवलकर, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संदीप पाटील आदी उपस्थित होते. मेळघाटामध्ये आरोग्य शिक्षणाबद्दल अंधश्रद्धा अधिक आहे. स्थलांतराचा प्रश्न सोडविण्यासाठी मजुरांना मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण देण्याच्या सूचना केल्या. आरोग्य सेवेबाबत जनजागृतीमुळे ७५ टक्के आदिवासी आरोग्य केंद्रांचा लाभ घेत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील साधन सामुग्री अद्ययावत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना दिल्यात. टेलिमेडिसीन सेंटरव्दारे आतापर्यंत ५० हून अधिक रुग्णांना दुर्धर आजारावरील सल्ला दिल्याची व उपचार केल्याची माहिती या केंद्राव्दारे मिळत असल्यामुळे रुग्ण दगावत नाही. मेळघाटात शासनाने टेलिमेडिसीन सुविधा उपलब्ध केल्यामुळे आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)