शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था शाळा ‘ओपनिंग’साठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 05:00 IST2020-11-17T05:00:00+5:302020-11-17T05:00:21+5:30
मात्र, जानेवारीनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यामुळे नववी ते बारावीपर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेत कसे पाठवावे, शाळेत गर्दी वाढेल, मुले एकमेकांच्या संपर्कात येतील, अशा एक ना अनेक प्रश्नांमुळे पालक वर्ग चिंतेत आहेत. शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी मुलांना शाळेत शिकवणीसाठी पाठविणे गरजेचे आहे, असा दुसरा सूरही पालकांमध्ये उमटू लागला आहे.

शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था शाळा ‘ओपनिंग’साठी सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोराेना नियमावलींचे पालन करीत २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याच्या मुद्द्यावर मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये उत्साह आहे. मात्र, कोरोना संसर्ग अद्यापही कायम असल्याने पालकांमध्ये मात्र संभ्रम कायम असल्याचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची चिंता त्यांना सतावत आहे.
राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे शालेय सत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, संस्थाचालकांना मार्गदर्शक सूचना पत्राद्वारे पाठविल्या आहेत. यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपण्यास प्राधान्य दिले आहे. राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त कोविड-१९ नियमावलींचे पालन होणे अनिवार्य केले आहे. मात्र, जानेवारीनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यामुळे नववी ते बारावीपर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेत कसे पाठवावे, शाळेत गर्दी वाढेल, मुले एकमेकांच्या संपर्कात येतील, अशा एक ना अनेक प्रश्नांमुळे पालक वर्ग चिंतेत आहेत. शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी मुलांना शाळेत शिकवणीसाठी पाठविणे गरजेचे आहे, असा दुसरा सूरही पालकांमध्ये उमटू लागला आहे.
शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गखोल्या सॅनिटाईझ केल्या आहेत. पुन्हा येत्या आठवड्यात वर्गखोल्या सॅनिटाईझ केले जातील, असे ज्ञानमाता हायस्कूलचे कार्यालय अधीक्षक रवि शर्मा यांनी सांगितले.
अशा आहेत शाळांसाठी मार्गदर्शक सूचना
शाळांची नियमित स्वच्छता,
निर्जंतुकीकरण
बाधित असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच शाळेत प्रवेश
सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान एचआरसीटी तपासणी
शाळेत आपत्कालीन गट, स्वच्छता गट स्थापन करणे
विद्यार्थ्यांना दिवसाआड शाळेत प्रवेश
विद्यार्थ्यांना दिवसाआड शाळेत प्रवेश मिळणार आहे. शाळेत ५० टक्के, तर घरी ऑनलाईन शिक्षणासाठी ५० टक्के उपस्थिती राहणार आहे. वर्गात एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल. नववी ते बारावीपर्यंत ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करताना पालकांना सोबत यावे लागणार आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होतील. मुख्याध्यापकांना पत्राद्धारे शाळांचे सॅनिटायझेशन, विद्यार्थ्यांचे आरोग्य जाेपासणे, स्वच्छता आदींबाबत अवगत केले आहे.
- ई. झेड. खान,
शिक्षणाधिकारी, अमरावती.