दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
By प्रदीप भाकरे | Updated: May 25, 2025 18:38 IST2025-05-25T18:38:19+5:302025-05-25T18:38:28+5:30
दोन लहानग्या मुलींचे मातृछत्र हरपले : पतीसह पाच जणांविरूद्ध एफआयआर

दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
प्रदीप भाकरे/
अमरावती : पुण्याच्या मुळशीमधील हगवणे कुटुंबातील वैष्णवीच्या आत्महत्येची घटना राज्यभर गाजत असताना, अमरावतीच्या जयभोले काॅलनीतही रविवारी सकाळी तशीच धक्कादायक घटना घडली. पती आणि सासरच्या मंडळींच्या अनन्वित छळाला कंटाळून येथील एका ३२ वर्षीय अधिकारी सीएचओ महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
शुभांगी नीलेश तायवाडे (३२, रा.जयभोले कॉलनी, तपोवन, अमरावती) असे मृत विवाहितेचे नाव आहे. दुसऱ्यांदा मुलगी झाल्याने पतीसह सासू, भासरा व नणंदेने तिचे जगणे कठीण केले होते. रविवार, २५ मे रोजी सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान ती घटना उघड झाली. शुभांगी या सीएचओ (सामुदायिक आरोग्य अधिकारी) म्हणून कार्यरत होत्या.
या प्रकरणी मृत शुभांगीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी रविवारी दुपारी मृताचा पती नीलेश (३५), भासरा नितीन (३८), सासू (७०), नणंद व भाचा या पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. मृताचा पती, सासू व नणंदेस ताब्यात घेण्यात आले आहे. १३ महिने वयाच्या मुलीला पाळण्यातून बाहेर बेडवर ठेवत शुभांगीने पाळण्याच्या दोरीने आत्मघात केला. तर तिची अडीच वर्षांची दुसरी मुलगी हॉलमध्ये खेळत होती. आरोपी पती निलेश हा बॅंक मॅनेजर आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये शुभांगीचे लग्न झाले होते. निलेशने तिला नोकरी सोडण्याचाही तगादा लावला होता.