उन्हाळी सुटी हिरावतेय आयुष्याचा आधार
By Admin | Updated: April 12, 2015 00:24 IST2015-04-12T00:24:08+5:302015-04-12T00:24:08+5:30
उन्हाळ्याची शाळेला सुट्टी लागल्यानंतर प्रत्येक घरातील मूल या सुट्टीचा आनंद घेतात़ ..

उन्हाळी सुटी हिरावतेय आयुष्याचा आधार
धक्कादायक : नदी, विहिरींनी घेतले बळी
मोहन राऊत अमरावती
उन्हाळ्याची शाळेला सुट्टी लागल्यानंतर प्रत्येक घरातील मूल या सुट्टीचा आनंद घेतात़ परंतु जन्मदात्याचे लक्ष नसल्याने आतापर्यंत या उन्हाळी सुट्टीने जिल्ह्यात ११ वर्षांत नऊ मुलांचा बळी घेतल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़ उन्हाळ्याची सुट्टी आयुष्याचा आधार हिरावून घेणारी ठरू शकते़ विहीर, नदीत पोहायला गेल्यामुळे जीव गमविण्याच्या घटना घडल्या आहेत़
सध्या सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा संपत असून आगामी तीन ते चार दिवसांत उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत़उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे बालगोपालांसाठी आनंदाची पर्वणीच असते़ मग ती सुट्टी कोणतीही असो़ त्यात उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे तर या चिमुरड्यांना सोन्याहून पिवळेच. नो आभ्यास, नो कटकट, नो पालकांची झंझेट, तब्बल दोन महिन्याहून अधिक काळ मौजमजा अन मस्तीच, शहरी भागात उन्हाळी अभ्यास वर्ग असेल तरी ग्रामीण भागातील मुलांचा आजही खेळण्याकडे कल आहे़ पूर्वीच्या कथा अन् गाण्यातील मामांचे गाव आता उरले नसले तरी चिमुरड्यांमध्ये अद्यापही गावाकडची ओढ आहेच़ सुट्ट््या लागल्या रे लागल्या की, बालगोपालांना गावाकडचे वेध लागतात़ गावी मग मित्र, मैत्रिणी, नात्यातील सहकारी यांची गट्टी जुळली की त्यांच्या खेळण्याला जणू काही आकारच राहत नाही़ अगदी देहभान हरपून बालचमू सुट्टीचा आनंद घेत असतात़ त्यांचे जेवण्याकडेही लक्ष नसते़ दिवसभर उन्हातान्हात खेळण्यातच त्यांचा आनंद समावलेला असतो़ पोटात काय असले काय अन् नसले काय़, त्यांना काहीही फरक पडत नाही़ भुकेलाही त्यांनी जणूकाही सुट्टीच दिलेली असते़ पूर्वीचे खेळ आता हरवून गेले असून अनेक खेळ तर केव्हाच काळाच्या पडद्याआड गेले आहेत़
चिमुरड्यांच्या भांडीकुंडी, खेळाचा बाज मात्र आजही टिकवून आहे़ ही चिमुरडी मंडळी मिळेल त्या जागेत कधी कोनाड्यात तर कधी छपरात कधी काट्याकुट्यात तर कधी अगदी घरातील एखाद्या मोडक्या टेबलखालीही भांडीकुंडीचा संसार थाटत असतात़ कोण भरउन्हात पोहायला जातो तर कोण सावलीत पत्याचा डाव मांडत असतो़ अनेकजण कॅरमसारखे बैठे खेळही खेळत उन्हाची तिरीप घालवतात़ उन्ह खाली झाले की क्रिकेटच्या मैदानावर बालगोपलांची जणूकाही जत्राच भरत असते़ खेळाचा मनमुरादपणे आनंद लुटणाऱ्या या चिमुरड्यांकडे अनेकदा पालकांचे लक्ष नसते़ त्यातून अनेकदा या बालगोपाळांना दुखापतीचा सामना करावा लागतो़ इथपर्यंत ठीक, पण दुर्देवी घटनेत निष्पाप जीव जेव्हा जातो तेव्हा केलेल्या दुर्लक्षांचा पालकांना पश्चाताप होतो़ मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते़ अशा अनेक घटनांमुळे पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे़
मुलांची घ्या विशेष काळजी
मुले खेळताना दुरून लक्ष ठेवा, धोकादायक वस्तू, कीटकनाशके मुलांच्या हाती लागतील अशी ठेवू नका, नाकातोंडात सहज जातील अशा छोट्या वस्तू मुलांपासून दूर ठेवा, अडचणीत अन् काट्याकुट्यात खेळू देऊ नका, जबाबदार व्यक्तीसोबतच पोहायला पाठवा, उष्म्यामुळे साप गारव्याच्या ठिकाणी आसरा घेत असतात हे गृहीत धरून मुलांच्या खेळण्याच्या जागा ठरवा, गारव्यासाठी घराबाहेर झोपणाऱ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे़