सुरेंद्र कधीच कापत नव्हता लिंंबू !
By Admin | Updated: August 19, 2016 23:56 IST2016-08-19T23:56:56+5:302016-08-19T23:56:56+5:30
पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमातील निवासी विद्यार्थ्यांच्या भोजनव्यवस्थेसाठी नेमलेला ....

सुरेंद्र कधीच कापत नव्हता लिंंबू !
गुन्ह््यांवर पांघरूण : संशयास्पद बाबींकडे दुर्लक्ष का ?
अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमातील निवासी विद्यार्थ्यांच्या भोजनव्यवस्थेसाठी नेमलेला स्वयंपाकी सुरेंद्र मराठे हा भोजन वाढताना विद्यार्थ्यांना कधीच लिंबू कापून देत नव्हता. सुरेंद्रच्या या विचित्र आणि संशयास्पद वागणुकीची अधीक्षक, वसतिगृह समिती आणि आश्रम ट्रस्टने कधीही दखल घेतली नाही. सुरेंद्रच्या संशयास्पद वागणुकीला मिळालेले बळ आश्रमाच्या हेतूवर संशय निर्माण करणारे आहे.
ज्या सुरेंद्रच्या आक्षेपार्ह वर्तनाकडे व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले गेले, त्या सुरेंद्रनेच प्रथमेशचा गळा कापण्याचा आणि झोपेतील अजयचा चेहरा ठेचण्याचा गंभीर गुन्हा केला आहे.
अनुदानित वसतिगृहात सुरेंद्रची नेमणूक करताना नियमानुसारची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पोटात जाणारे अन्न जी व्यक्ती तयार करणार आहे, तिला ताऊन-सुलाखूनच नेमायला हवे होते. संबंधित व्यक्तीची नेमणूक केल्यावर काही काळ तिच्यावर देखरेख ठेवणे हे वसतिगृह अधीक्षक, वसतिगृह समिती आणि आश्रम ट्रस्टचे कर्तव्य ठरते. विषय थेट शेकडो चिमुकल्या मुलांच्या आयुष्याशी संबंधित असल्यामुळे प्रत्येकच पातळीवर संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षता महत्त्वपूर्ण होती.
लिंबू आणि सुरेंद्र
सुरेंद्र हा काळी विद्या, नरबळी या विधींवर विश्वास ठेवतो. संबंधित पुजेत लिंबाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. लिंबू कापण्याचा संबंध त्याच्या अघोरी शक्तींच्या जागरणासाठी केल्या जाणाऱ्या आवाहनाशी आहे. लिंबू कापण्यामुळे अलौकिक शक्तीप्राप्तीदरम्यान अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी त्याची धारणा असल्यामुळे तो अख्खे लिंबू विद्यार्थ्यांपुढे ठेवायचा. कापायचे असल्यास विद्यार्थ्यांनी ते कापून घ्यावे. अन्यथा लिंबाविना भोजन घ्यावे, असा त्याचा खाक्या.
सुरेंद्रचे हे वागणे वसतिगृह नियमावलीच्या विरुद्ध होते. वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार दररोज घडत होता. विद्यार्थी याबाबत खुली चर्चा करीत होते. आश्रमपरिसरात ही चर्चा सातत्याने होऊनही कुणीच कशी दखल घेतली नाही?
विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्थित मिळते की नाही, याची शहानिशा करणे नियमानुसार वसतिगृह व्यवस्थापन समितीचे कर्तव्य ठरते. त्यांनी ते निभावले का नाही? वसतिगृह समिती कर्तव्यात कसूर करीत असेल तर ज्या आश्रमाच्या अखत्यारित हे वसतिगृह सुरू आहे, त्या आश्रम ट्रस्टने समितीला जाब का विचारला नाही? शाळा, वसतिगृहाचे अनुदान कायम राखण्यासाठी विद्यार्थी आणण्याचे कष्ट घेतले जातात. आईवडिलांपासून नेलेल्या विद्यार्थ्यांची काळजी वाहताना मग संवेदना का बोथट झाल्या?
अधिकाऱ्यांची नियुक्ती कशासाठी?
अमरावती : अधीक्षक, वसतिगृह व्यवस्थापन समिती आणि आश्रम ट्रस्ट यांनी सुरेंद्रची विद्यार्थ्यांसोबत असलेली संशयास्पद वागणूक दुर्लक्षित केली. त्यामागील नेमके कारण शोधणे पोलिसांचे कर्तव्य आहे. सुरेंद्र नरबळीच्या ज्या भयंकर उद्देशाने आश्रमपरिसरात वास्तव्याला होता, त्या उद्देशात सफलता मिळवून देण्यासाठी तर हे दुर्लक्ष केले गेले नव्हते ना?
सुरेंद्र शयनकक्षात कसा?
वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शयनकक्षात स्वयंपाकी सुरेंद्र याने प्रवेश करून अजयचा चेहरा नरबळीच्या उद्देशाने ठेचला होता. प्रश्न हा उपस्थित होतो की, स्वयंपाकी सुरेंद्र हा लहान मुलांच्या शयनकक्षात प्रविष्ठ झालाच कसा? शासनाच्या नियमानुसार हा गंभीर दोष सिद्ध होतो. सुरेंद्रला असहाय मुलांच्या कक्षात जाण्याची मुद्दामच कुणी मुभा तर दिली नाही ना ? समाजकल्याण आणि पोलीस खात्याकडून या मुद्याची कसून चौकशी व्हायलाच हवी.
अधिकारी कशासाठी?
वसतिगृहातील मुले खोलीच्या फ्लोअरवर झोपी गेल्याचेही वास्तव या गुन्ह्याच्या तपासादरम्यान बेमालूमपणे उघड झाले. मुलांच्या झोपण्याची ही सोय नियमबाह््य आहे. जिल्हा समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांनी या सर्व गंभीर मुद्यांची नव्याने चौकशी करणे गरजेचे आहे. त्यांनी यापूर्वी केलेली चौकशी प्रथमेश हल्यासंबंधिची होती. आता वसतिगृहात अजयवर झालेल्या हल्ल्याची तत्थ्ये चौकशीअंती शोधून काढणे हे जिल्हा समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांचे कर्तव्य आहे.
घटना घडल्यावर चौकशी करून शासनाला अहवाल पाठविण्याऐवजी अनुदानित शाळा, वसतिगृहांमध्ये गुन्हे घडूच नये यासाठीच चव्हाण यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना अधिकार बहाल करण्यात आले आहेत. सोईसुविधा देण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठा बजावली असती तर वसतिगृहात गळे कापणे, चेहरा ठेचण्याचे प्रकार घडले असते काय?