दुचाकी चोरीत बुलढाण्याच्या रामाला अकोल्याच्या सूरजची साथ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 18:13 IST2022-12-16T18:12:07+5:302022-12-16T18:13:13+5:30
बुुलढाण्यातून येऊन येथील दुचाकींवर डल्ला मारणाऱ्या २० वर्षीय सराईत वाहन चोराला राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

दुचाकी चोरीत बुलढाण्याच्या रामाला अकोल्याच्या सूरजची साथ!
अमरावती :
बुुलढाण्यातून येऊन येथील दुचाकींवर डल्ला मारणाऱ्या २० वर्षीय सराईत वाहन चोराला राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याने येथील वाहन चोरीच्या तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून १.२० लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अकोला येथील सूरज ठाकूर याच्या मदतीने ती वाहने चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे. रामा ऊर्फ रामेश्वर एकनाथ सावळे (२०, रा. बोरखेड धाड, बुलढाणा), असे अटक आरोपीचे नाव आहे.
फ्रेजरपुरा येथील आकाश कांबळे यांची दुचाकी एका मेडिकलसमोरून चोरीला गेली होती. त्यावरून फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हादेखील नोंदविला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने राजापेठ पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून रामा ऊर्फ रामेश्वर सावळे याला ताब्यात घेतले असता, त्याने फ्रेजरपुरा ठाण्यात नोंद गुन्ह्यासह अन्य काही दुचाकी चोरीचे गुन्हे त्याचा मित्र सूरज ठाकूर, रा. अकोला याच्यासह केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. पीसीआरदरम्यान आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वातील ‘टीम राजापेठ’ने ही कारवाई केली. अंमलदार मनीष करपे, रवी लिखितकर, दानिश शेख, सागर भजगवरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू असताना त्यातील बोटांवर मोजण्याइतपत गुन्ह्यांची उकल होत आहे.