सारांश छोट्या बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:31 IST2020-12-11T04:31:15+5:302020-12-11T04:31:15+5:30

धारणी : तालुक्यातील डाबका ते सावलीखेडा दरम्यान दुचाकीला दिलेल्या धडकेत त्यावर स्वार दोघे जखमी झाले. गौतम भगत व देविदास ...

Summary short news | सारांश छोट्या बातम्या

सारांश छोट्या बातम्या

धारणी : तालुक्यातील डाबका ते सावलीखेडा दरम्यान दुचाकीला दिलेल्या धडकेत त्यावर स्वार दोघे जखमी झाले. गौतम भगत व देविदास नागले अशी जखमी वनकर्मचाऱ्यांची नावे आहेत. ६ डिसेंबर रोजी सकाळी हा अपघात घडला. धारणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------

धारणीत तरुणाला मारहाण

धारणी : येथील हर्ष नामक १८ वर्षीय तरुणाला पाण्याचे शिंतोडे उडाल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली तसेच शिवीगाळ करण्यात आली. ६ डिसेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी आरोपी रशीद सौदागर, आसिफ सौदागर, राजिक सौदागर, आरीफ सौदागर व अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------------

स्टेट बँक कॉलनीतून दुचाकी लंपास

परतवाडा : येथील स्टेट बँक कॉलनीतील रहिवासी डॉ. राम ठाकरे यांच्या घरातून एमएच २७ बीएस ०७०१ क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. ३ डिसेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी ६ डिसेंबर रोजी परतवाडा पोलिसांनी ६ रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------

चांदूर बाजारात भावाला मारहाण, शिवीगाळ

चांदूरबाजार : येथील सुरज अविनाश शेळके यास मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी दिनेश अविनाश शेळके व करण दिनेश शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------------

चांदूर बाजारातून दुचाकी लंपास

चांदूर बाजार : येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोरच्या मेडिकललगत ठेवलेली एमएच २७ एडब्ल्यू ८८२० क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. ६ डिसेंबर रोजी दुपारी ५ च्या सुमारास ही घटना घडली. चांदूर बाजार पोलिसांनी उमेश निकम (३१, रा. पिंपरी पूर्णा) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

शिवशाहीची चारचाकी वाहनास धडक

नांदगाव खंडेश्वर : भरधाव शिवशाही बसच्या धडकेत कारचालकाला मुका मार लागला व बरेच नुकसान झाले. ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ६.२० च्या दरम्यान नांदगाव ते यवतमाळ मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला. अशोक साहेबराव घोळवे (३३, जुनी वस्ती, बडनेरा) असे जखमीचे नाव आहे. एमएच २७ डीए १६७१ क्रमांकाच्या कारने ते दारव्हा तालुक्यातील ब्रम्ही गावाकडे जात असताना, एमएच ०६ बीडब्ल्यू ०२३१ क्रमांकाच्या शिवशाही बसने त्यांच्या कारला मागून धडक दिली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी शिवशाही बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------------------

ट्रेलरच्या धडकेत पादचारी गंभीर

तिवसा : रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास ट्रेलरने धडक दिली. यात संजय चौधरी (रा. शेंदूरजनाबाजार) हे गंभीर जखमी झाले. ४ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास तिवसा येथील पंचवटी चौकात हा अपघात घडला. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी अमित चौधरी यांच्या तक्रारीवरून सीजी ०४ एनएच ४५२५ क्रमांकाच्या ट्रेलरच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

गोकुळढुसा येथे तरुणाला मारहाण

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील गोकुळढुसा येथील विक्की वासुदेव पवार (२७) याला काठीने मारहाण करण्यात आली. उधार पैसे देण्यास नकार दिल्याने ६ डिसेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपी इंद्रपाल भोसले (रा. गोकुळढुसा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------------

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील धनेगाव येथील एका ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. ५ डिसेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपी दादू ऊर्फ प्रज्वल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

ग्रामीण भागात पेटू लागल्या शेकोट्या

भातकुली : थंडीचा जोर वाढू लागल्याने ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. सायंकाळी ६ नंतर थंडीचा प्रकोप वाढू लागल्याने लोकरी कपडेदेखील बाहेर निघाले आहेत. मफलर, स्वेटरचा सर्वाधिक वापर होत आहे. रात्रीच्या वेळी तापमान १० अंश सेल्सिअसवर येत आहे.

--------------

आयटीआय उत्तीर्णांसाठी

९ डिसेंबरला रोजगार मेळावा

अमरावती : औद्योगिक प्रशिक्षण संस्थाद्वारे मूलभूत प्रशिक्षण तथा आनुषंगिक सूचना केंद्र यांच्यामार्फत येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील एन.एस हॉलमध्ये ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मूळ कागदपत्रांसह या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अंशकालीन प्राचार्य एम.डी. देशमुख यांनी केले आहे.

---------------

विद्यापीठात आज वेबिनार

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने राजीव गांधी सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी कमिशन योजनेंतर्गत विद्यापीठ प्रणालीमार्फत विज्ञान व तंत्रज्ञान अर्जासाठी साहाय्य या विषयावर एकदिवसीय जागरूकता वेबिनारचे आयोजन ९ डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे.

----------------------

शेतकरी आंदोलनाला प्राथमिक शिक्षक समितीचा पाठिंबा

अमरावती : कंत्राटी शेती, अत्यावश्यक वस्तू कायद्यातील बदल आणि कृषिउत्पन्न बाजार समिती कायदा मोडीत काढणारे असे केंद्र सरकारने केलेले तीनही कृषी कायदे रद्द करण्यात यावे, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पाठिंबा दर्शविला आहे.

--------------

फोटो पी ०८ बऱ्हाणपूर

बऱ्हाणपूर शाळेत महापरिनिर्वाण दिन

मोर्शी : तालुक्यातील बऱ्हाणपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर तुळे, उपाध्यक्ष अनिल भोंडे, मुख्याध्यापक नीलेशकुमार इंगोले, अंगणवाडी सेविका विमल ढगे, सतीश ढगे, सविता शेकार, सहायक शिक्षक दिलीप चांदुरे, दिलीप तुळे, महेंद्र गायकी, सुहास ढगे, रवींद्र वाकपैंजण, सुमीत खुळे, लक्ष्मण शेकार, तन्वी ढगे, मदतनीस नर्मदा शेरे आदी उपस्थित होते.

----------------

Web Title: Summary short news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.