सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:13 AM2021-04-28T04:13:23+5:302021-04-28T04:13:23+5:30

अचलपूर : येथील किला भागात शेख इलियास (४०) याला मारहाण करण्यात आली. २५ एप्रिल रोजी ही घटना घडली. जागेत ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

अचलपूर : येथील किला भागात शेख इलियास (४०) याला मारहाण करण्यात आली. २५ एप्रिल रोजी ही घटना घडली. जागेत लाकूड टाकण्याच्या वादातून ही घटना घडली. याप्रकरणी अचलपूर पोलिसांनी आरोपी शेख इलियास शेख कलीम, शेख कलीम, शेख अस्लम, शेख नन्हा (सर्व रा. किला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

--------------

जागेच्या वादातून इसमाला मारहाण

अचलपूर : आरामशीनच्या जागेवर ठेवलेले लाकूड उचलण्याच्या वादातून मो. अस्लम शेख रसूल (५७, अशरफपुरा) यांना मारहाण करण्यात आली. २५ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अचलपूर पोलिसांनी शेख इलियास शेख महमूद (४०, रा. किला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

---------------

उधारीच्या वादातून तरुणाला मारहाण

अचलपूर : उधारीच्या वादातून अजय घोटकर (३५, जुनी चाळ) याला लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. २५ एप्रिल रोजी ही घटना घडली. अचलपूर पोलिसांनी आरोपी प्रफुल देशमुख (३५, रा. बिलनपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

मार्कंडा शिवारातील गहू जाळला

ब्राम्हणवाडा थडी : येथील विलास देवराव गवई यांच्या शेतातील गव्हाच्या पेंड्या जाळण्यात आल्या. २४ एप्रिल रोजी रात्रीनंतर हा प्रकार उघड झाला. ती गंजी गावातीलच देविदास गवई व अनिल गवई या दोघांनी जाळली असावी, अशी शक्यता व्यक्त करणारी तक्रार विलास गवई यांनी २५ एप्रिल रोजी ब्राम्हणवाडा पोलिसांत नोंदविली.

-------------

परतवाड्यात तरुणीचा विनयभंग

परतवाडा : येथील एका २५ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आला. १ ते ३ डिसेंबर २०२८ दरम्यान हा प्रकार घडल्याची तक्रार संबंधित तरुणीने २५ एप्रिल रोजी परतवाडा पोलिसांत नोंदविली. याप्रकरणी आरोपी योगेश साळवे (३०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

--------

दुचाकीच्या धडकेत इसम गंभीर

परतवाडा : गुजरी बाजार मार्गावर दुचाकीच्या धडकेत एक इसम गंभीर जखमी झाला. २४ एप्रिल रोजी सायंकाळी हा अपघात घडला. याप्रकरणी जखमी व्यक्तीचा पुतण्या कुशल कोठारी (कांडली) याच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी एका अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------------------

सोनोरा येथे तरुणाला मारहाण

चांदूररेल्वे : वडिलांना कट का मारला, अशी विचारणा करणाऱ्या आशिष मोरे (४०, सोनोरा) याला मारहाण करण्यात आली. २४ एप्रिल रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी वैभव ऊर्फ बंटी काळबांडे (रा. सोनोरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

पळसखेडच्या अपघातात मृताविरुद्ध गुन्हा

चांदूर रेल्वे : तालुक्यातील पळसखेड गावाजवळ २५ एप्रिल रोजी दुपारी ३ च्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात प्रवीण मुळे (रा. पडेगाव, देवळी) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी मृताविरुद्ध गुन्हा नोंदविला. प्रवीणचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून त्याच्यासह दोन अन्य जखमी झाले होते.

-------------

‘त्या’ अपघातप्रकरणी दुचाकीस्वाविरुद्ध गुन्हा

दर्यापूर : येथील एका कन्स्ट्रक्शन कंपनीसमोर २४ एप्रिल रोजी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गौरव इंगळे (रा. लाखपुरी) याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी एमएच ३० बीके ५८१६ या दुचाकीच्या चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी विजय तायडे (२२, रा. भुजवाडा) याने तक्रार नोंदविली.

-------------

पूर्णा नदीच्या पात्रातून रेतीचोरी

येवदा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांडोळा येथील पूर्णा नदीच्या पात्रातून रेतीचोरीचा प्रकार उघड झाला. तलाठी व अन्य लोकांना पाहून चालकाने रेती व ट्रॅक्टर ट्रॉलीसह पळ काढला. २५ एप्रिल रोजी ही घटना घडली. तलाठी योगेश नागरे यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टरमालक विठ्ठल शेंडे (रा. कट्यार, अकोला) व अन्य तीन चार अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

----------------------

आष्टोली येथून दुचाकी लंपास

मोर्शी : तालुक्यातील आष्टोली येथील श्याम चिखले यांच्या मालकीची एमएच २७ बीवाय ३५७० या क्रमांकाची दुचाकी त्यांच्या घरासमोरून लंपास करण्यात आली. २४ ते २५ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------

रवि पिंपळगावकर विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीवर

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे निवृत्त प्र-वित्त व लेखा अधिकारी रवि पिंपळगावकर यांची नुकतीच सन २०२१ ते २०२६ या कालावधीकरिता विदर्भ साहित्य संघाच्या मानद सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर व कार्यकारिणी सदस्य यांनी त्यांची विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीवर नामित सदस्यपदी नियुक्ती केली आहे.

-----------

आसरा सर्कलमधील रस्ते नादुरुस्त

गणोरी : भातकुली तालुक्यातील आासरा जिल्हा परिषद सर्कलमधील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. त्यापैकी आसरा-कावसा जोडरस्ता, गणोरी-बहाद्दरपूर, शिवणी-खरबी-शिपगाव-बहाद्दरपूर, पेढी काऊंटर-बहाद्दरपूर आदी रस्ते हे विनापरवाना जड वाहतूक केल्याने अत्यंत खराब झाले आहेत. लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष चालविले आहे.

-------------

‘मेळघाटातील पाणीसमस्या निवारण करा’

अमरावती : मेळघाट आदिवासीबहुल क्षेत्रासह ईतर तालुक्यातील पाणीटंचाईची कामे त्वरित करण्याची मागणी खा. नवनीत राणा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आजही मेळघाटात पिण्याचे पाणी लांब पायी चालत आणावे लागते. कोरोनाकाळात तीव्र पाणीटंचाई उदभवू शकेल, अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली.

--------------

वीजग्राहकांना स्वत:हून पाठविता येणार मीटर रीडिंग

अमरावती : वीज ग्राहकांना स्वत:हून दरमहा मीटर रीडिंग पाठविण्याची सोय व त्यासाठी चार दिवसांची मुदत उपलब्ध झाली आहे. कोरोना संसर्गामुळे अनेक ठिकाणी महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास वीज ग्राहकांनाच ते पाठविता येईल. महावितरणचे अ‍ॅप किंवा वेबसाईटद्वारे ग्राहकांनी स्वत:हून मीटर रिडींग पाठवावे, असे आवाहन अमरावती परिमंडलच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी केले.

-------

आरोग्य केंद्राची इमारत पूर्णत्वास

पथ्रोट : जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, आरोग्य सभापती यांच्या प्रयत्नाने येथील आरोग्य केंद्राची इमारत पूर्णत्वास गेली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना अंतर्गत ५ कोटी ६० लक्ष रुपयांच्या निधीतून विद्युत पुरवठा व फर्निचरचे काम करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी सर्वसामान्यांनाना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे.

-----------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.