आष्टगावात सुकी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प
By Admin | Updated: December 25, 2015 01:11 IST2015-12-25T01:11:01+5:302015-12-25T01:11:01+5:30
मोर्शी तालुक्यातील आष्टगाव येथे सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी ‘सुकी नदी’ बारमाही वाहणारी होती. नदीमध्ये खूप खोल डोह होते.

आष्टगावात सुकी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प
गजलकार पांचाळेंचा पुढाकार : पत्रपरिषदेत दिली माहिती
अमरावती : मोर्शी तालुक्यातील आष्टगाव येथे सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी ‘सुकी नदी’ बारमाही वाहणारी होती. नदीमध्ये खूप खोल डोह होते. एकेकाळी मे महिन्यात खळबळ वाहणारी ही सुकी नदी आता भर पावसाळ्यात कोरडी पडली आहे. नदीतील पाचही बंधारे आज गाळाने भरले आहेत. त्यामुळे गावातील पाण्याचे स्त्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच शिवारातील विहिरी व इंधन विहिरीची भूजल पातळी कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात मोठे जलसंकट येण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन गजलकार सुरेश भट ग्रंथालय व वाचनालयात मंगळवारी सुकी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी पत्रपरिषद घेण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी नेदरलंडचे गिरीश ठाकूर होते. प्रमुख अतिथी म्हणून एसडीओ ललितकुमार वऱ्हाडे, जलतज्ज्ञ भूवैज्ञानिक पालनदास घोडेस्वार, सरपंच कांताबाई इंगळे, पोलीस पाटील दिलीप पाटील, अंबाडाचे मुरलीधर पिसे, भीमराव पांचाळे उपस्थित होते. यावेळी नेदरलंडचे गिरीश ठाकूर यांनी त्यांच्या देशातील नागरिकांनी निसर्गाशी लढा देऊन पाण्याचे व्यवस्थापन कसे केले यावर मार्गदर्शन केले. आष्टगाव सुकी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. एसडीओ ललितकुमार वऱ्हाडे यांनी आष्टगावला जलयुक्त शिवारात घेतल्याचे सांगून ही नदी उन्हाळ्यातसुद्धा बळखळ वाहत राहील, असा विश्वास व्यक्त केला. जलतज्ज्ञ भूवैज्ञानिक पालनदास घोडेस्वार यांनी वैज्ञानिक पद्धतीने उदाहरणे देऊन शंकाचे समाधान केले.