बडनेरा रेल्वे स्थानकावर ऑटो चालक-आरपीएफमध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 21:42 IST2018-12-16T21:41:38+5:302018-12-16T21:42:02+5:30
बडनेरा रेल्वे स्थानकावर विकस्ळीत वाहतूक व्यवस्थेला ऑटो चालक कारणीभूत असल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी रविवारी रात्री १२ वाजेनंतर ते सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यास ऑटोचालकांनी तीव्र विरोध दर्शवून आरपीएफसोबत वाद घातला. दरम्यान ऑटोचालकांचे प्रतिनिधी आणि आरपीएफचे अधिकारी यांच्यात सर्वांगीण चर्चा झाली.

बडनेरा रेल्वे स्थानकावर ऑटो चालक-आरपीएफमध्ये वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा रेल्वे स्थानकावर विकस्ळीत वाहतूक व्यवस्थेला ऑटो चालक कारणीभूत असल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी रविवारी रात्री १२ वाजेनंतर ते सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यास ऑटोचालकांनी तीव्र विरोध दर्शवून आरपीएफसोबत वाद घातला. दरम्यान ऑटोचालकांचे प्रतिनिधी आणि आरपीएफचे अधिकारी यांच्यात सर्वांगीण चर्चा झाली. अखेर तास, दीड तासांच्या तणावानंतर रेल्वे स्थानक परिसरातील परिस्थिती सुरळीत झाली, हे विशेष.
आरपीएफच्या सूत्रानुसार, रेल्वे स्थानक परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे कुठे काय सुरू आहे, याचे थेट नियंत्रण भुसावळ येथून चालते. त्याअनुषंगाने रविवारी भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे प्रबंधक आर. के. यादव यांनी बडनेरा रेल्वे स्थानकाची पाहणी केली. तिकीट बुकींग, वाहनतळ आणि आॅटो स्टॅन्ड परिसरात त्यांना वाहतूक व्यवस्था विकस्ळीत होत असल्याच्या लक्षात आले. त्यामुळे आरपीएफ यंत्रणेला प्रंबधकांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. कालांतराने आरपीएफ जवानांनी आॅटोरिक्षासह चारचाकी, दुचाकीसह अन्य वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी चोख बंदोबस्त ठेवला. मात्र, रात्रीच्यावेळी ऑटो रिक्षांनी एका रांगेत वाहने उभी ठेवावी, अशा सूचना कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानांनी ऑटो चालकांना केल्यात. परंतु, आॅटो चालकांनी आरपीएफच्या या सूचनांचे पालन केले नाही. मर्जीनुसार ऑटो बेशीस्तपणे उभे केले. त्यामुळे आरपीएफ जवानांनी ऑटोचालकांना कारवाई करण्याची धमकी दिली. यातून ऑटो चालक आणि आरपीएफ जवानांत वाद झाला. ऑटो चालक संख्येने जास्त असल्याने ते एकवटले. कालांतराने आरपीएफ जवानांनी ऑटोचालकांच्या अरेरावीबाबत वरिष्ठांना अवगत केले. अशातच शाब्दिक वाद उफाळून आला. रेल्वे स्थानकाच्या ऑटोच्या संख्येमुळे दर्शनी भागात गर्दी वाढली. नेमके काय झाले हे प्रवाशांना रात्रीच्यावेळी कळत नव्हते. दरम्यान, ऑटोतून प्रवासी नेण्यास चालकांना मनाई करण्यात आली. ऑटोरिक्षा निश्चित जागेवरच उभे केले जातील, यावर ऑटोचालक ठाम होते. मात्र, प्रवाशांना त्रास होणार नाही, अशा ठिकाणी ऑटोरिक्षा उभे करावी, अशा सूचना आरपीएफ जवानांच्या होत्या. तास, दीड तासांच्या वादानंतर ऑटोरिक्षा संघटनेचे नेते नितीन मोहोड आणि आरपीएफचे निरीक्षक राजेश बढे हेदेखील घटनास्थळी पोहचले. यावेळी मोहोड आणि बढे यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा केली. कालांतराने ऑटो रिक्षा प्रवाशांना त्रास किंवा गैरसोय होणार नाही, अशा ठिकाणी उभे करण्यावर एकमत झाले. ऑटो चालकांनी प्रवासी सेवा लक्षात ठेवून वाहतूक नियमांचे पालन करावे, अशा सूचना यावेळी आरपीएफ यंत्रणेकडून देण्यात आल्यात.
ऑटोचालकांचे कृत्य कॅमेऱ्यात कैद
ऑटो चालकांचे वर्तणूक कशी असते, हे दरदिवशी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून भुसावळ येथील वरिष्ठांना क्षणात बघता येते. बडनेरा ते भुसावळ असे कंट्रोल तिसऱ्या डोळ्यातून आता सहजशक्य आहे. त्यामुळे बडनेरा रेल्वे स्थानकावर ऑटो चालकांची अरेरावी, प्रवाशांसोबत असभ्य वागणूक, विस्कळीत वाहतूक यंत्रणा आदी बाबीला ऑटो चालक जबाबदार असल्याचे आरपीएफ प्रशासनाचे म्हणने आहे. अशातच रात्रीच्या वेळी काही ऑटो चालक ‘भाईगिरी’ देखील करीत असल्याच्या तक्रारी आरपीएफकडे प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
अंतर्गत स्पर्धेमुळे प्रवाशांचे हाल
ऑटोरिक्षा आणि शहरबस यांच्यात प्रवासी मिळविण्याची स्पर्धा नित्याचीच बाब आहे. त्यामुळे बाहेरगावाहून प्रवासी आल्यास त्याला हेरण्यासाठी ऑटोचालकांमध्ये अंतर्गत स्पर्धादेखील पहावयास मिळते. यात प्रवाशाचे हाल होत आहे.
ऑटो रिक्षा स्टॅन्डवर उभे करण्याच्या विषयावरून काही वेळ वाद झाला होता. मात्र, यातून सकारात्मक तोडगा काढला गेला. प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही, या अटीवर ऑटोचालकांना स्टँन्डवर रिक्षा ठेवण्याची मुभा दिली.
- राजेश बढे, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल बडनेरा.