पित्याची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या, धामणगाव गढी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 18:00 IST2017-11-04T18:00:33+5:302017-11-04T18:00:58+5:30
मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बाप-लेकांचा मृतदेह शनिवारी दुपारी २ च्या सुमारास अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी येथील एका विहिरीत आढळून आला.

पित्याची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या, धामणगाव गढी येथील घटना
परतवाडा - मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बाप-लेकांचा मृतदेह शनिवारी दुपारी २ च्या सुमारास अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी येथील एका विहिरीत आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली.
सदानंद लालजी दहीकर (३५, रा. फुकटपुरा, धामणगाव गढी) याने गौरव (५) व पिनू (७) या अपत्यांसह विहिरीत उडी घेतली. धामणगाव गढी येथील दीपक अग्रवाल यांच्या शेतातील मजूर शनिवारी दुपारी विहिरीवर गेला असताना त्याला तिघांचे मृतदेह पाण्यात आढळले. सदानंद दहीकर हा आचारीचे काम करीत होता, तर त्याची पत्नी चिखलदरा तालुक्यातील कालापानी या सहा किलोमीटर अंतरावरील गावात राहत होती.
सदानंदला काही दिवसांपासून दारूचे व्यसन जडले होते. तो मुला-मुलीसह गुरुवार सायंकाळपासून बेपत्ता होता. घटनास्थळी दाखल झालेल्या परतवाडा पोलिसांनी गावक-यांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. आत्महत्येच्या कारणांचा तपास परतवाडा पोलीस करीत आहेत. प्रथमदर्शनी जरी ही आत्महत्या वाटत असली तरीदेखील शवविच्छेदन अहवालानंतर अनेक बाबी स्पष्ट होतील. तूर्तास मर्ग दाखल केला असल्याचे परताड्याचे ठाणेदार संजय सोळंके यांनी सांगितले.
पत्नी होती माहेरी
मागील काही दिवसांपासून सदानंदची पत्नी माहेरी गेली होती. पत्नीला अनेकदा घरी परत आणण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, ती परत आली नाही. यामुळे तो कमालीचा निराश झाला होता. यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.