तरुणीची हत्या की आत्महत्या ?
By Admin | Updated: May 24, 2017 00:07 IST2017-05-24T00:07:22+5:302017-05-24T00:07:22+5:30
विदर्भ महाविद्यालयाच्या केशवराव भोसले सभागृहामागील विहिरीत एका २२ वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आल्याने मंगळवारी सकाळी खळबळ उडाली.

तरुणीची हत्या की आत्महत्या ?
व्हीएमव्ही परिसरात आढळला मृतदेह : वसतिगृहातील मुलींची चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भ महाविद्यालयाच्या केशवराव भोसले सभागृहामागील विहिरीत एका २२ वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आल्याने मंगळवारी सकाळी खळबळ उडाली. अनोळखी तरुणीची हत्या करण्यात आली की तिने आत्महत्या केली, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
गाडगेनगर पोलिसांनी वसतिगृहातील मुलींची चौकशी आरभंली असून यामुलींपैकी कुणी बेपत्ता आहे का, याविषयी पोलीस माहिती काढत आहेत. सोमवारी सायंकाळी विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत कार्यरत एक कर्मचारी केशवराव भोसले सभागृहामागील पडिक जमिनीवर असलेल्या विहिरीवरील पाण्याची मशिन सुरु करण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांना विहिरीत तरूणीचा मृतदेह तरगंताना आढळून आला. त्यांनी ही माहिती प्राचार्य यावले यांना दिल्यावर त्यांनी तत्काळ गाडगेनगर पोलिसांना कळविले. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. २० ते २२ वर्षे वयोगटातील तरूणीचा हा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. मृत तरूणीच्या उजव्या हातावर इंग्रजीत "ए" व आकाश असे लिहिले आहे. तसेच तिच्या अंगावर गुलाबी सलवार (टॉप) व फिकट गे्र रंगाचा लेगिन असल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृतदेहाला जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात ठेवले आहे. याघटनेमुळे परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. तसेच विविध चर्चांना उत आला होता. तरूणीची हत्या की आत्महत्या या दिशेने पोलीस आता तपासकार्य करणार आहेत.
सुट्यांमुळे वसतिगृह बंद
व्हीएमव्हीतील मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनी सद्यस्थितीत सुटीवर गेल्या आहेत. विविध शहरातील यामुली आपापल्या घरी गेल्यामुळे वसतिगृह बंद आहे. या विद्यार्थिनी आपआपल्या घरी पोहोचल्या आहेत किंवा नाहीत, याची माहिती गाडगेनगर पोलीस काढत आहे. त्यासाठी मुलींच्या कुटुंबियांशी संपर्क साधल्या जात आहे. वसतिगृहातील मुलगी बेपत्ता आढळल्यास तशी कारवाई केली जाईल.
तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा संशय
तरुणीचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आल्यावर तो काही प्रमाणात कुजलेला होता. तीन दिवसांपूर्वीच तिचा मृत्यु झाला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. सभागृहामागील भकास परसिरात दाट झुडुपे वाढल्यामुळे तेथे कोणी जात नाही. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले. अशा ठिकाणी मृतदेह आढळणे, ही बाब घातपाताकडे दिशानिर्देश करणारी आहे.