त्याचा जगण्यासाठी असाही संघर्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST2021-03-13T04:23:59+5:302021-03-13T04:23:59+5:30

दुचाकी अपघातानंतर आखूड झाला पाय, झोपताना कमरेत प्रचंड वेदना, चालताही येईना मोहन राऊत धामणगाव रेल्वे : दुसऱ्याच्या शेतात काबाडकष्ट ...

Such a struggle for his survival! | त्याचा जगण्यासाठी असाही संघर्ष !

त्याचा जगण्यासाठी असाही संघर्ष !

दुचाकी अपघातानंतर आखूड झाला पाय, झोपताना कमरेत प्रचंड वेदना, चालताही येईना

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : दुसऱ्याच्या शेतात काबाडकष्ट करून संसाराचा गाढा ओढणाऱ्या एका शेतमजुराला चारचाकीने उडविले. शस्त्रकियेनंतर एका पायाची लांबी सात ते आठ इंचाने कमी झाली. अपघातात जीव वाचला तरी चालताही येत नाही अन कमरेतील वेदनेमुळे झोपताही येत नाही, अशी अवस्था जळका पटाचे येथील या मजुराची झाली आहे. कोरोनाकाळात आपल्या कुटुंबासाठी त्याचा अविरत संघर्ष सुरू आहे.

तालुक्यातील जळका पटाचे या तीन हजार लोकवस्तीच्या गावातील विजय वासुदेव लोखंडे (४२) या शेतमजुराची ही व्यथा आहे. विजय हा २ जानेवारी २०२० रोजी आपल्या गावाहून धामणगावला कामासाठी आला. येथून परत जात असताना एका चारचाकी वाहनाने आसेगावनजीक त्याच्या दुचाकीला उडवले. मदत करतो, पण पोलीस ठाण्यात तक्रार करू नको, असे म्हटल्याने व ग्रामस्थांना कायद्यािवषयी सहसा असलेल्या अज्ञानामुळे विजयने पोलीस ठाण्यात धाव घेतली नाही. वाहनचालकाने विजयच्या हाती केवळ पाच हजार रुपये हातात टिकवले. त्यानंतर फिरकूनही पाहिले नाही. विजयला नागपूर येथे मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केल्यानंतर उजव्या पायाचे ऑपरेशन केले. यात मांडीतील हाड न जुळल्यामुळे उजवा पाय सात ते आठ इंच कमी झाला. तदनंतर कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित झाले. आपल्या मांडीचे ऑपरेशन होईल व पुन्हा आपल्याला चालता येईल, या आशेने दोन ते तीन वेळा नागपूर गाठले. मात्र, कोरोनामुळे नागपुरातील सर्जरी वाॅर्ड बंद करण्यात आला आहे. आता विजयला चालता येत नाही आणि झोपले तर कंबरेत वेदना होतेय. विजयला पत्नी व मुलगी आहे.

सामाजिक संघटनानी घ्यावा पुढाकार

एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, दुसरीकडे घरातील कर्ता पुरुषाचा पाय निकामी झाल्याने तो बिछान्यावर आहे. त्यामुळे विजयची पत्नी चिंतेत आहे. धामणगाव गॅस डोमेस्टिक अप्लायसन्सचे संचालक निखिल भंसाली यांच्यापर्यंत ही बाब पोहोचताच स्वत: मदत करीत इतर सामाजिक संस्थेतर्फे मदत व्हावी म्हणून विजयची व्यथा ऑनलाइन फेसबूक लाईव्ह केली. दुबईतील एका व्यक्तीने पाच हजार रुपये विजयच्या बँक खात्यात टाकले. घरात अठराविश्वे दारिद्ऱ्य असलेल्या विजयचा संघर्ष कमी व्हावा, यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

----------------------------------

Web Title: Such a struggle for his survival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.