ऐंशी वर्षाच्या तरुणाची किमया अन् गांधारीचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:17 IST2021-08-27T04:17:37+5:302021-08-27T04:17:37+5:30
गजानन चोपडे, संपादकीय प्रमुख, अमरावती आवृत्ती ऐंशी वर्षाच्या तरुणाची किमया अन् गांधारीचे यश ना जन्म देणारा फादर, ना मार्ग ...

ऐंशी वर्षाच्या तरुणाची किमया अन् गांधारीचे यश
गजानन चोपडे, संपादकीय प्रमुख, अमरावती आवृत्ती
ऐंशी वर्षाच्या तरुणाची किमया अन् गांधारीचे यश
ना जन्म देणारा फादर, ना मार्ग दाखविणारा गाॅडफादर... तरी शे-सव्वाशे अनाथ पोरी धीराने जगत आहेत. कारण त्यांच्या पाठीशी आहेत त्यांचे ‘बाबा’... शंकरबाबा! कुठे तरी बेवारस सापडलेल्या या मुलींना शंकरबाबांनी वझ्झरच्या बाल सुधारगृहात ‘घरपण’ दिलेय. पतंग आपल्या क्षमतेनेच उडत असते. पण तिची दोरी समंजस हातात असेल तरच पतंगाच्या भरारीला दिशा गवसते. भविष्य लाभते. अशा शंभराहून अधिक मुलींची ‘कटी पतंग’ शंकरबाबांच्या आधाराने आज नवी उमंग घेऊन आकाशाला गवसणी घालू लागली आहे. काहींनी सुखाचा संसारही थाटला आहे. त्यातल्याच एका ‘गांधारी’ने दोन दिवसांपूर्वी संगीत विशारद होऊन जगाला नवा कृतार्थ सूर दिलाय... तिच्या यशाचे वेगळेपण थेट अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या काळजाला भिडले अन् जिल्हाधिकारी पोहोचल्या वझ्झरच्या बाल सुधारगृहात...
गांधारी... निर्दयी जन्मदात्यांनी तिला दिव्यांग म्हणून पंढरपुरातील गोदावरी नदीकाठी टाकून दिले. पोलिसांना बेवारस सापडलेल्या या चिमुकलीचे तीन वर्षांपर्यंत तेथील नवरंगी बालगृहात पालन-पोषण झाले. सहा वर्षाची असताना ती अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्वर्गीय अंबादासपंत वैद्य मतिमंद बाल सुधारगृहात आली. हीच चिमुकली गांधारी शंकरबाबा पापळकर या नावाने व तिच्या सुमधुर स्वराने आता ओळखली जाते. बेवारस, दिव्यांग, गतिमंद बालकांचे पालन पोषण करणारे अनाथांचा नाथ शंकरबाबा पापळकर आज १२३ मुलांचे पालक आहेत. २४ मुलांचे लग्न झाले. ९८ मुली व २५ मुलं असून १७ मुलं मिरगीच्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. उकिरड्यावर, मंदिराबाहेर, कुठे रस्त्यावर टाकलेल्या बेवारस, गतिमंद, दिव्यांग, विविध बालगृहातून आलेल्या या मुलांचा सांभाळ १९९१ पासून शंकरबाबा पापळकर नावाचा अवलिया करतोय. त्याच्या या महान कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असली तरी १८ वर्षांवरील दिव्यांग मुलांच्या कायद्यासाठी शंकरबाबांची लढाई अजूनही अर्धवटच आहे. परतवाडा ते धारणी मार्गावर वझ्झर नावाचे गाव. २५ एकर जागेत या दिव्यांग मुलांना घेऊन शंकरबाबा राहतात. त्यांचा सांभाळ करतात.
सहाव्या वर्षी बाल कल्याण समितीचा आदेश घेऊन पोलिसांनी वझ्झर येथील स्वर्गीय अंबादास पंथ वैद्य दिव्यांग बाल गृहात दाखल केले आणि तेव्हापासून ती शंकरबाबाची लेक झाली. संगीत विशारद झालेल्या गांधारीचे कौतुक करण्यासाठी परवा जिल्हाधिकारी पवनीत कौर स्वत: पोहोचल्या. तिचे औक्षण केले. आपल्या मुलीचे कौतुक होत असल्याचा प्रसंग शंकरबाबा डोळ्यात टिपून हरखून गेले. गांधारी अंध आहे. तिच्या हातापायात त्राण नाही. त्यामुळे तिला तबला वादन किंवा पेटी वाजविता आले नाही. परंतु तिच्या गळ्यातील गोडव्यामुळे संगीताची आवड तिला लागली आणि संगीताच्या एकानंतर एक परीक्षा देत सातवी परीक्षा तिने उत्तीर्ण केली. मोबाईलवर गाणे ऐकून ती सराव करते.
आपल्या कौतुकाची बातमी लोकमतमध्ये झळकल्याचे कळताच गांधारी बाबांकडे आली. ‘बाबा, मला माझा फोटो दाखवा ना’, म्हणत आपली उत्कंठा व्यक्त करू लागली; पण अंध असलेल्या आपल्या मुलीला तिचा फोटो दाखवायचा तरी कसा, हा प्रश्न शंकरबाबांना अस्वस्थ करून गेला. माझ्यानंतर या मुलांचे काय होईल, यांना कोण आधार देईल, कोण यांना दिशा दाखवेल, असे अनेक प्रश्न शंकरबाबा त्यांच्या बाल सुधारगृहाला भेट देणाऱ्यांना विचारतात. १८ वर्षांवरील दिव्यांग मुलांचा सांभाळ करण्यासाठी देशात कायदा होणे गरजेचे आहे, त्या दिशेने शंकरबाबांचा लढा सुरू आहे. भेटेल त्याला हा कायदा होण्यासाठी मदत करण्याची गळ घालताना त्यांना बघितले की, या ऐंशी वर्षाच्या तरुणाची ही धडपड नक्कीच सार्थकी लागणार, असा विश्वास वाटतो. नुसते अनाथ मुलांचा सांभाळ करूनच हा तरुण थांबला नाही, तर बाल सुधारगृह परिसरात तब्बल १५ हजार झाडे लावून तेथे नंदनवन फुलविले. ऑक्सिजन देणाऱ्या याच झाडांमुळे माझ्या लेकरांना मी कोरोनापासून वाचवू शकलो, असे सांगत असताना बाबांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांचे निसर्गप्रेमही दर्शवितो. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनाही त्यांनी या मुलांचा सांभाळ करण्यासाठीचा कायदा होण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. आपण हयात असेपर्यंत तरी हा कायदा अमलात यावा, अशी माफक अपेक्षा शंकरबाबांची असेल तर त्यांचे चुकले तरी कुठे...