विनाछताच्या शाळेत विद्यार्थ्यांचे विद्यार्जन !

By Admin | Updated: June 27, 2016 00:02 IST2016-06-27T00:02:03+5:302016-06-27T00:02:03+5:30

शाळेची पहिली घंटा २७ जून रोजी होणार. परंतु पहिल्याच दिवशी येथील भिलखेडा व अतिदुर्गम हातरू येथील आदिवासी विद्यार्थ्यांना विनाछताच्या शाळेत उघड्यावर बसूनच विद्यार्जन करावे लागणार आहे.

Students in the School of Destiny! | विनाछताच्या शाळेत विद्यार्थ्यांचे विद्यार्जन !

विनाछताच्या शाळेत विद्यार्थ्यांचे विद्यार्जन !

भिलखेड्याच्या शाळेची दुर्दशा : आजपासून नवे शैक्षणिक सत्र
नरेंद्र जावरे चिखलदरा
शाळेची पहिली घंटा २७ जून रोजी होणार. परंतु पहिल्याच दिवशी येथील भिलखेडा व अतिदुर्गम हातरू येथील आदिवासी विद्यार्थ्यांना विनाछताच्या शाळेत उघड्यावर बसूनच विद्यार्जन करावे लागणार आहे. एकीकडे साक्षरतेचा मंत्र गिरवीत असताना दिसून येणारे हे चित्र प्रचंड संतापजनक आहे.
दीड महिन्यापूर्वी वादळामुळे शाळेच्या वर्गखोल्यांचे छप्पर उडाले होते. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यास पुरेसा अवधी होता. तरीही या शाळेची दुरूस्ती करण्यात आली नाही. अखेरीस आदिवासी विद्यार्थ्यांना आकाशाच्या छताखालीच अभ्यास करावा लागणार आहे. शाळेचे छप्पर उडाल्याची माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षणाधिकारी व बांधकाम विभागाला देण्यात आली होती.

३८ वर्गखोल्या जीर्ण
चिखलदरा : मात्र, तरी सुद्धा कुंभकर्णी झोपेत असलेल्या जिल्हा प्रशासनाला जाग आली नाही. उद्या शाळेचा पहिला दिवस आहे. राज्यभर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाईल. परंतु मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांचे स्वागत तर सोडाच त्यांना चक्क उघड्यावर बसूनच नव्या सत्राचा श्रीगणेशा करावा लागेल.
चिखलदरा तालुक्यात जिल्हा परिषदेतर्फे चालविण्यात येणाऱ्या १६८ प्राथमिक शाळा असून ५४० वर्गखोल्या आहेत. त्यापैकी जवळपास दीडशे खोल्या नादुरुस्त आहेत. ३८ वर्गखोल्या पूर्णत: जीर्ण झाल्या आहे. त्यामध्ये सलोना, कामापूर, मोथा, भुलोरी, रायपूर, सखारखेडा, सेमाडोह, कारंजखेडा, पलश्या, बुटीदा, काजलडोह, मोरगड, गरजदरी, जामली आर, हिरदामल, कालापाणी, मोझरी, बोदू येथील प्रत्येकी एक वर्गखोली तर गांगरखेडा, बोराळा, वस्तापूर, भिलखेडा, माखला, हातरू येथील प्रत्येकी दोन वर्गखोल्यांचा समावेश आहे. भेडोरा, रजनीकुंड, चुरणी येथील तीन वर्गखोल्या नादुरुस्त आहेत.

शिक्षकांसाठी एकही निवासस्थान नाही
चिखलदरा तालुक्यात ५४० वर्गखोल्या असून तेवढेच शिक्षक आहेत. मात्र, १६८ शाळांवरील या ५४० शिक्षकांसाठी राहण्यायोग्य एकही निवासस्थान नाहीत. परिणामी चिखलदरा, परतवाडा, अंजनगाव, धारणी, अमरावती येथून दररोज शिक्षक ये-जा करतात. त्यामुळे १८ हजार विद्यार्थ्यांना कसे शिक्षण मिळत असावे, याचा अंदाज जाणकारांना लावता येईल.

शासनाचा बांधकाम विभाग निकृष्ट
चिखलदरा पं.स. व जि.प. बांधकाम विभागाच्यावतीने मेळघाटातील शाळा, निवासस्थाने, शासकीय इमारतींसह रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत. त्यामुळेच या इमारती वेळेपूर्वीच जीर्ण झाल्याचे चित्र असताना दुसरीकडे वर्ल्ड व्हिजन, एमपीटी संस्थेतर्फे बांधून दिलेल्या वर्गखोल्या दर्जेदार आहेत. पं.स.बांधकाम विभागाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

भिलखेडा येथील शाळेचे छप्पर दीड महिन्यांपूर्वी उडाले आहे. तशी माहिती संबंधितांना दिली आहे. २७ जून रोजी तेथील शाळा अंगणवाडी केंद्रात भरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. एमपीटी या संस्थेतर्फे शाळेला तात्पुरते शेड उभारून दिले जात आहे.
- मनोहर गायकवाड,
गटशिक्षणाधिकारी,
पंचायत समिती, चिखलदरा.

Web Title: Students in the School of Destiny!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.