ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 05:01 IST2022-05-07T05:00:00+5:302022-05-07T05:01:03+5:30
एनएसयूआयचे राष्ट्रीय महासचिव नागेश करिआप्पा, प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, प्रदेश महासचिव आकांक्षा ठाकूर, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष संकेत कुलट यांच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर धाव घेतली. ‘जैसी शिक्षा वैसी परीक्षा’ असा गगनभेदी नारा देत एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारावर चढून विद्यापीठात प्रवेश केला. त्यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा राडा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा २०२२ ऑनलाइन घ्याव्यात, या मागणीसाठी एनएसयूआयच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी विद्यापीठात शुक्रवारी जोरदार राडा केला. मागण्यांचे पत्रकही फेकले. दरम्यान पोलिसांसोबत झटापटही झाली. विद्यार्थी आक्रमक होत असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्याशी चर्चा करून शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन सादर केले. मात्र, एनएसयूआयचे आंदोलन म्हणजे महाविकास आघाडी सरकारला घरचा अहेर ठरला, असे बोलले जात आहे.
एनएसयूआयचे राष्ट्रीय महासचिव नागेश करिआप्पा, प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, प्रदेश महासचिव आकांक्षा ठाकूर, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष संकेत कुलट यांच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर धाव घेतली. ‘जैसी शिक्षा वैसी परीक्षा’ असा गगनभेदी नारा देत एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारावर चढून विद्यापीठात प्रवेश केला. त्यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कुलगुरूंच्या दालनाकडे प्रवेशासाठी विद्यार्थी आक्रमक झाले असताना पोलीस आणि एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. काही वेळातच पोलीस उपायुक्त एम. एम. मकानदार विद्यापीठात दाखल झाले. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पथक आंदोलक विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असताना क्यूआरटी पथकही पोहोचले. काही वेळाने एनएसआयूआयचे शिष्टमंडळ कुलगुरूंसोबत चर्चा करण्यासाठी गेले असता, बाहेर आंदोलक विद्यार्थ्यांची नारेबाजी सुरूच ठेवली. गत आठवड्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाइन होतील असा निर्णय घेतला. तथापि, काँग्रेसप्रणीत एनएसयूआयने ऑनलाईन परीक्षेसाठी काढलेल्या मोर्चामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नाही, असे चित्र दिसून आले.
परीक्षांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी ना. उदय सामंत यांनी ऑफलाइन परीक्षेचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यापीठाने तयारी चालविली आहे. मात्र, एनएसयूआयने ऑनलाइन परीक्षांविषयी निवेदन दिले, ते शासनाकांकडे पाठविले जाईल.
- डॉ. दिलीप मालखेडे, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
विद्यार्थ्यांनी पोलिसांशी झटापट केली नाही. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेविषयी तीव्र भावना होत्या. शिक्षण ऑनलाइन झाले तर परीक्षा ऑफलाईन का, विद्यार्थी हितासाठी हे आंदोलन होते. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढा कायम राहील.
- आमीर शेख, प्रदेशाध्यक्ष, एनएसयूआय