सत्र सुरू होऊनही पाठपुस्तकांचे वाटप नाही
अमरावती : कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेनंतर नवीन शैक्षणिक सत्राला २८ जूनपासून सुरूवात झाली. मात्र, शाळांमध्ये विद्यार्थी घरीच अन् शिक्षक शाळेत असल्याने जणू शिक्षकांचीच शाळा भरल्याचे चित्र लोकमतच्या रिॲलिटी चेक मध्ये दिसून आले. विशेेष म्हणजे शैक्षणिक सत्र होऊन विद्यार्थ्याना मात्र पाठपुस्तके वाटप झाले नाहीत.
कोरोनामुळे गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन व इतर माध्यमातून मुलांचे शिक्षण सुरूच होते. गतवर्षी जानेवारी महिन्याचे काही दिवस व फेब्रुवारी महिना एवढेच दिवस पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा भरली होती. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग गेल्यावर्षी भरले नव्हते. यावर्षीही कोरोनामुळे विद्यार्थ्यांविना शाळा भरली. सोमवारी लोकमतने वास्तविकता तपासण्यासाठी जिल्हा परिषद माजी शासकीय मुलींची उर्दू शाळा येथे भेट दिली. यानंतर जिल्हा परिषद माजी शासकीय कन्या शाळेला भेट दिली असता, तेथे एकूण ७ शिक्षक कार्यरत आढळून आले. या ठिकाणी शाळेत शालेय कामकाज सुरू होते. शिक्षक दहावीच्या निकालाची संदर्भात काम करतांना दिसून आले. गर्ल्स हायस्कूल मध्ये १८ शिक्षक पदे मंजूर आहेत. यात मुख्याध्यापकांचे पद रिक्त आहेत. यामुळे १७ पैकी १६ शिक्षक हजर होते. एक शिक्षक शाळेच्या पहिल्या दिवशीच रजेवर असल्याचे दिसून आले. शाळेत पहिल्या दिवसी कामकाजाची माहिती व दहावीच्या निकालाचे कामकाज सुरू होते. दहाव्या वर्गातील विद्यार्थ्याचे ऑनलाईन गणित विषयाचे वर्ग सुरू असल्याचे दिसून आले. विशेष शाळा परिसर शुकशुकाट होता. बहुतांश वर्गखोल्यांना टाळे दिसून आले.
बाॅक्स
पहिला दिवस शिक्षणाविनाच
जिल्ह्यातील शाळांचे शैक्षणिक सत्र सोमवारपासून सुरू झाले. मात्र, विद्यार्थी शाळेत हजर नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याच्या सूचना असल्या तरी शाळांना दिलेल्या भेटीत ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग तुरळक दिसून आले. अनेक शिक्षक शाळेत हजर होते. या शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून माझी स्वच्छ - सुंदर शाळा, शालांत प्रमाणपत्र परीक्षा, मुल्यांकन, परिसर स्वच्छता, शाळा सिध्दी, यु-डायस प्लस, कार्यालयीन अभिलेखे पूर्ण करणे व इतर अनुषंगिक कामे करताना दिसून आले.