विद्यार्थी अपघात विमा योजनेत संसर्ग, दुर्धर आजारांचाही समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:14 IST2020-12-31T04:14:06+5:302020-12-31T04:14:06+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता अपघात विमा योजनेत संसर्ग, दुर्धर आजाराचाही लाभ मिळेल. मंगळवारी आयोजित ...

विद्यार्थी अपघात विमा योजनेत संसर्ग, दुर्धर आजारांचाही समावेश
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना
आता अपघात विमा योजनेत संसर्ग, दुर्धर आजाराचाही लाभ मिळेल. मंगळवारी आयोजित ऑनलाईन सिनेट सभेत या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. या याेजनेचे स्वरूप आणि व्याप्ती निश्चित करण्याची जबाबदारी विद्यार्थी विकास विभागाकडे साेपविली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ चे कलम २९ (छ) नुसार राज्यपाल नामित सिनेट सदस्य मनीष गवई यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा प्रस्ताव सादर केला होता. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे. त्यामुळे महाविद्यालयीन प्रवेशाच्यावेळी विद्यार्थ्यांना अपघात विमा योजना लागू केली जाते. मात्र, हल्ली परिस्थिती लक्षात घेता अपघात विमा योजना विद्यार्थ्यांचे आरोग्य हित जोपासण्यासाठी सर्वंकष ठरणारी नाही, ही बाब मनीष गवई यांनी सिनेटमध्ये निदर्शनास आणून दिली. भविष्याचा वेध लक्षात घेता अपघात विमा योजनेत विद्यार्थ्यांना संसर्ग, दुर्धर आजारांचाही लाभ मिळावा, असे योजनेचे स्वरूप असावे, अशी मागणी त्यांनी केली. एकप्रकारे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे दायित्व स्वीकारावे, अशी विनंती गवई यांनी सभागृहात केली. त्याअनुषंगाने उत्पल टोंगो, श्रीकांत पाटील, दिनेश सातंगे यांनी या प्रस्तावाचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांना आरोग्य कवच मिळावे, यापेक्षा दुसरे काय समाधान असावे, अशी भावना अनेक सदस्यांनी व्यक्त केली. दरम्यान, कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी सदस्यांच्या चर्चेअंती विद्यार्थी अपघात विमा योजनेत संसर्ग, दुर्धर आजाराचा समावेश करण्यासाठी तत्त्वत: मान्यता प्रदान केली.
-------------------
सुधारित प्रस्ताव तयार होणार
सामूहिक विमा योजनेचे स्वरूप ठरविण्यासाठी विद्यापीठ विकास विभागाकडे विद्यार्थी अपघात विमा योजनेचे सुधारित प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी सोपविली आहे. यात विद्यार्थ्यांवर आर्थिक भार येणार नाही आणि आरोग्य हित जोपासता येईल, त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश कुलगुरुंनी दिले आहेत. सुधारित प्रस्तावाच्या शिफारशी व्यवस्थापन परिषदेत मंजूर केल्यानंतर विद्यार्थी अपघात विमा योजनेत संसर्ग, दुर्धर आजाराचा समावेश करण्यात येईल, अशी माहिती आहे.
----------------
मनीष गवई यांनी मांडलेला प्रस्ताव विद्यार्थी हिताचा आहे. यात आणखी सुधारणा करण्यासाठी नव्याने प्रस्ताव तयार केला जाणार आहे. अपघात विमा योजनेत संसर्ग, दुर्धर आजारांचा समावेश करून यात विद्यार्थ्यांचे आरोग्य जोपासले जाईल.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ