संपकऱ्यांचा थाळीनाद, प्रत्येक कार्यालयावर धरणे; जुनी पेन्शनसाठी वेधले लक्ष
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 20, 2023 15:56 IST2023-03-20T15:55:17+5:302023-03-20T15:56:48+5:30
गुरुवारी जिल्हा कचेरीवर काळे झेंडे

संपकऱ्यांचा थाळीनाद, प्रत्येक कार्यालयावर धरणे; जुनी पेन्शनसाठी वेधले लक्ष
अमरावती : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जिल्हाभरात सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयासमोर सोमवारी थाळीनाद करत मागण्यांकडे लक्ष वेधले. येथील जिल्हा परिषदेसमोर बहुतांश संघटना एकवटल्या यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
जिल्ह्यात जुनी पेन्शनसह इतरही प्रलंबित मागण्यासाठी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी संघटना १४ मार्चपासून संपावर गेल्याने प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. १८ मार्चला संपकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर विराट मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर शनिवार व रविवार सार्वजिनक सुटी असतांनाही काही संघटनांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले. याशिवाय सोमवारी जिल्हा परिषदेसमोर लांब असा मंडप घालण्यात आला होता. येथे बहुतांश कार्यालयाचे कर्मचारी एकवटले व त्यांनी मागण्यांसदर्भात घोषणा देत सोबत आणलेल्या थाळ्या वाजवल्या. त्यामुळे दुपारी १२ च्या सुमारास या परिसरात या थाळ्यांचा नाद चांगलाच घुमत होता.
आंदोलनाची तीव्रता आला वाढत असून आतापर्यंत संपात नसलेल्या तलाठी संघटना संपात सहभागी झाली आहे. याशिवाय पुढील आठवड्यात मंडळ अधिकारी व राजपत्रित अधिकाऱ्यांची संघटनादेखील यामध्ये सहभागी होणार असल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगितले.