तिसऱ्या दिवशीही तणावपूर्ण शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:38 IST2018-07-03T22:38:11+5:302018-07-03T22:38:30+5:30
नांदगाव पेठ येथे दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर तणावपूर्ण वातावरण निर्मित झाले. मंगळवारी तिसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयासह व्यापार बंद ठेवल्यामुळे सन्नाटा होता. या घटनेच्या अनुषंगाने बजरंग दल व हेल्पलाईनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेऊन शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी चर्चा केली.

तिसऱ्या दिवशीही तणावपूर्ण शांतता
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नांदगाव पेठ येथे दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर तणावपूर्ण वातावरण निर्मित झाले. मंगळवारी तिसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयासह व्यापार बंद ठेवल्यामुळे सन्नाटा होता. या घटनेच्या अनुषंगाने बजरंग दल व हेल्पलाईनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेऊन शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी चर्चा केली.
विशीष्ट समुदयातील वारंवार गुन्हे करणाऱ्या काही समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बजरंग दलाने केली. तर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील हेल्पलाईनचे प्रभाकरराव वैद्य यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी शांततापूर्ण वातावरणासाठी मदत करण्यासाठी पुढाकार दर्शविला आहे. बजरंग दलाचे संतोष गहरवार, शिवराजसिंह राठोड, अनिल हिवे आदी उपस्थित होते.
मदतीसाठी हेल्पलाईन पोहोचली सीपींकडे
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील हेल्पलाईन शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नात असते. नांदगाव पेठ येथील जातीय तणाव पाहता हेल्पलाईनचे प्रमुख तथा ह.व्या.प्र. मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्यासह संजय तिरथकर व मुस्लीम समुदयातील नागरिकांनी सीपींची भेट घेतली. नागरिकांमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपले मत पोलीस आयुक्तांसमोर मांडले.
धार्मिक स्थळावर गोटमार
नांदगाव पेठेतील एका धार्मिक स्थळावर गोटमार झाल्याच्या माहितीने पोलिसांची मंगळवारी दुपारी भंबेरी उडाली. पोलिसांचा ताफा तत्काळ नांदगाव पेठेत पोहोचला. मात्र, ही अफवा असल्याचे निदर्शनास आले. नांदगाव पेठेत तणावपूर्ण शांतता असल्याचे चित्र होते. दरम्यान या अफवेमुळे परिसरातील बाजारपेठ व शाळा बंद ठेवण्यात आली. तीन आरोपींना बुधवारपर्यंत पीसीआर व अन्य आरोपींची जेलमध्ये रवाना झाली.