लघुशंकेला रस्त्याच्या कडेला थांबला अन् लुटला गेला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2022 22:06 IST2022-08-29T22:06:05+5:302022-08-29T22:06:32+5:30
Amravati News निर्जन स्थळ बघून लघुशंकेसाठी दुचाकीहून उतरलेल्या तरूणाला लुटण्यात आले. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास नविन बायपासवरील जुना टोलनाका भागात ही घटना घडली.

लघुशंकेला रस्त्याच्या कडेला थांबला अन् लुटला गेला!
अमरावतीः निर्जन स्थळ बघून लघुशंकेसाठी दुचाकीहून उतरलेल्या तरूणाला लुटण्यात आले. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास नविन बायपासवरील जुना टोलनाका भागात ही घटना घडली. याप्रकरणी त्या १९ वर्षीय तरूणाच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी अनोळखी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
मुर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील मुळ रहिवासी तथा येथील राजापेठ भागात भाडेकरू असलेला निशांत घाटे (१९) हा २८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून लघुशंकेकरीता थांबला. नविन बायपासवरील जुना टोलनाका भागात त्यावेळी तिघेजण बसले होते. निशांतला एकटे पाहून ते तिघेजण विनाकारण शिविगाळ करू लागले. निशांतने त्यांना शिविगाळ करू नका, असे बजावले असता एक काळी टी शर्ट घातलेला इसमाने निशांतचे खिसे तपासले. डोक्यात टोपी घातलेला, हिंदीत बोलणारा तो तरूण सुमारे २१ वर्षांचा होता. खिसे तपासण्यास विरोध केला असता दुस-या लाल पांढ-या रंगाची टीशर्ट घातलेल्या इसमाने निशांतला झापड मारली. तथा त्याच्या हातातील मोबाइल हिसकावला. तसेच तिस-या मुलाने निशांतच्या खिशातून ३ ग्राम सोन्याची अंगठी काढून घेतली. ते इसम विना क्रमांकाच्या दुचाकीने अकोलाकडे पळुन गेले. तीन अनोळखी इसमांनी आपल्याला रोखून, मारहाण करून लुटल्याची तक्रार निशांतने नोंदविली. पहाटे २.३६ च्या सुमारास तीन अज्ञातांविरूद्ध कलम ३९४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
त्याच स्पाॅटवर पुन्हा लूट
निशांत घाटे याला लुटल्यानंतर जुना जकात नाक्याजवळ पुन्हा एका दुचाकीस्वाराला चाकुचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना घडली. २८ ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास सौरभ वाहुरवाघ (१९, कारंजा लाड) हा दुचाकीने कारंजाकडे जात असताना जुन्या जकात नाक्याजवळ एकाने त्याला हात दाखवून थांबविले. थांबताच एका २२ ते २३ वर्षे वयोगटातील तरूणाने त्याला कानावर बुक्की मारली. समोरून आलेल्या दोन तरूणांनी देखील त्याला मारहाण केली. त्यातील एका मुलाने चाकुचा धाक दाखवून सौरभकडील दोन मोबाईल, हेडफोन लुटला. नंतर तिघेेही आरोपी जंगलाच्या दिशेने निघून गेले. याप्रकरणी २९ ऑगस्ट रोजी पहाटे ३.४० च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला