जिल्ह्यातील अवैध गुटखाविक्री तातडीने बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:12 IST2021-03-20T04:12:51+5:302021-03-20T04:12:51+5:30
अमरावती : जिल्ह्यात अवैध गुटखाविक्री फोफावली असून, ती तातडीने बंदी करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ...

जिल्ह्यातील अवैध गुटखाविक्री तातडीने बंद करा
अमरावती : जिल्ह्यात अवैध गुटखाविक्री फोफावली असून, ती तातडीने बंदी करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी, शहर पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांना बुधवारी निवेदन सादर करण्यात आले.
संगीता ठाकरे व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांची भेट घेऊन त्यांना जिल्ह्यातील अवैध गुटखाविक्रेत्यांची माहिती दिली. यावेळी प्रदेश सचिव कल्पना वानखडे, जिल्हा सचिव ममता हुतके, शहर कार्याध्यक्ष संगीता देशमुख, जिल्हा सरचिटणीस अस्मिता भडके, भातकुली तालुकाध्यक्ष सरला इंगळे उपस्थित होत्या.
राज्यामध्ये २०१२ पासून आघाडीच्या सरकारने ‘गुटखाबंदी’ केली असतानाही हा कायदा पायदळी तुडवीत अमरावती जिल्ह्यात व शहरात प्रत्येक पानटपरीवर अवैधरीत्या गुटखा व तंबाखूमिश्रित पानमसाला राजरोस सर्रास विक्री होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे तरुणाई, मजूर, पुरुष व महिला वर्ग व्यसनाधीन होत आहे. कर्करोग व तोंड बंद होण्याचे आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी दिली.