मंगल कार्यालयात कपडे बदलणाऱ्या मुलीचा चोरून काढला व्हिडिओ; नातेवाईकांनी धू धू धुतले!
By प्रदीप भाकरे | Updated: June 8, 2023 17:36 IST2023-06-08T17:36:14+5:302023-06-08T17:36:43+5:30
Amravati News मंगल कार्यालयातील एका खोलीत कपडे बदलवित असलेल्या मुलींचा चोरून व्हिडीओ काढणाऱ्या रोडरोमियोला वऱ्हाड्यांनी जाम धुतले.

मंगल कार्यालयात कपडे बदलणाऱ्या मुलीचा चोरून काढला व्हिडिओ; नातेवाईकांनी धू धू धुतले!
प्रदीप भाकरे
अमरावती: मंगल कार्यालयातील एका खोलीत कपडे बदलवित असलेल्या मुलींचा चोरून व्हिडीओ काढणाऱ्या रोडरोमियोला वऱ्हाड्यांनी जाम धुतले. अंजनगाव सुर्जी येथील एका मंगल कार्यालयात ७ जून रोजी रात्री ८ ते ८.१५ च्या सुमारास हा प्रकार घडला. चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मोहम्मद फुजेल मो. शौकत (२३, रा. काजीपुरा, इमाम चौक, अंजनगाव सुर्जी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारीनुसार, ७ जून रोजी रात्री अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलीचा लग्नसमारंभ तेथीलच एका मंगल कार्यालयात आयोजला होता. वर-वधूंकडील शेकडो वऱ्हाडी त्यात सहभागी झाले. त्यात फिर्यादी महिलेच्या घरातील मुली देखील सहभागी झाल्या होत्या. बुधवारी रात्री आठच्या सुमारास त्या मुली मंगल कार्यालयातील एका खोलीत तयार होत होत्या. त्यावेळी एका तरूणाने खिडकीतून चोरून त्या मुलींचा कपडे बदलवित असतानाच व्हिडिओ रेकार्ड केला. तो करीत असताना दोन तीन वऱ्हाड्यांनी त्याला पाहिले. जाब विचारला. त्याने आधी उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र, काही तरूणांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्यात क्षणभरापूर्वी केलेल्या मुलींची रेकार्डिंग दिसून आली. ते कळताच मंगल कार्यालयात हलकल्लोळ उडाला. अनेकांनी त्या तरूणाला बेदम चोप दिला.
पोलिसी खाक्या बसताच सांगितले नाव
आरोपी तरूणाने मार बसल्यानंतरही मी तो नव्हेच चा पवित्रा कायम ठेवला. मात्र, पोलिसी खाक्या बसताच त्याने स्वत:ची ओळख मोहम्मद फुजेल मो. शौकत अशी सांगितली. त्याच्याकडून तीन मोबाईलदेखील जप्त करण्यात आले. पाठोपाठ आरोपीने ज्या मुलींचे कपडे बदलवित असताना रेकार्डिंग केले, त्या मुलींशी संंबंधित असलेली ५२ वर्षीय महिला अंजनगाव पोलीस ठाण्यात पोहोचली. आरोपीविरूध्द ७ जून रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.